खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकरांनी आज खानापूर तालुक्यातील इटगी गावातील एका योजनेच्या शुभारंभप्रसंगी एक वादग्रस्त भाषण केले असून हे भाषण सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहे. सदर व्हिडिओमध्ये आमदार अंजली निंबाळकरांनी राजद्रोहासंदर्भात उल्लेख केला असून राजद्रोहाची नेमकी व्याख्या हि कुणासाठी आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
एका बाजूला मराठी माणसांच्या भावना आणि दुसऱ्या बाजूला आमदार अंजली निंबाळकरांच्या भाषणावरून कन्नड प्रसारमाध्यमांमध्ये ओकण्यात येणारी महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधातील गरळ! अशात आमदारांनी केलेल्या भाषणामुळे सध्या त्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.
सदर व्हिडिओमध्ये आमदार अंजली निंबाळकरांनी कर्नाटकात राहणाऱ्या राजद्रोह्यांची व्याख्या सांगितली असून जे कर्नाटकात राहतात, कर्नाटकचे अन्न, पाणी, मीठ खातात, आणि कर्नाटकाच्या विरोधात कृत्य करतात, अशा लोकांनी कर्नाटकात राहण्याची आवश्यकता नसल्याचे वक्तव्य केले आहे. परंतु हे वक्तव्य आमदार अंजली निंबाळकरांनी नेमके कोणाला उद्देशून म्हटले आहे.. हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
आमदार अंजली निंबाळकरांच्या या वक्तव्यानंतर अनेक कन्नड संघटना, कन्नड प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावरील तथाकथित कन्नड भाषा प्रेमींनी हे वक्तव्य महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी केले असल्याचा दावा केला आहे. मात्र सदर व्हिडिओमध्ये कुठेही महाराष्ट्र एकीकरण समितीचा किंवा मराठी भाषिकांचा उल्लेख केलेला निदर्शनास येत नाही. शिवाय आमदार अंजली निंबाळकर या इतर राजकारण्यांसाठी आदर्श असल्याचेही काही कन्नड अभिमान्यांनी सोशल साईटवर नमूद केले आहे.
आमदार अंजली निंबाळकरांनी खानापूरमध्ये केलेल्या त्या विधानानंतर सोशल मीडियावर त्या विधानाचा विपर्यास केला आहे कि अंजली निंबाळकरांनी महाराष्ट्र एकीकरण समितीशी निगडित हे विधान केले आहे? याबाबत सीमाभागात गोंधळ निर्माण झाला आहे. या प्रकरणासंदर्भात अधिक खुलासा आमदार अंजली निंबाळकरांनी देणे अपेक्षित आहे. अन्यथा हे विधान मराठी भाषिकांना डिवचण्याचा केले आहे, असा याचा अर्थ होईल. आणि मराठी भाषिकांचा रोष मात्र अंजली निंबाळकरांना ओढवून घ्यावा लागेल…!