कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर नजीकच्या परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्याचा आदेश सरकारने बजावला आहे. तेंव्हा आंतरराज्य सीमावर्ती चेकपोस्टच्या ठिकाणी त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जावी, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली.
बेळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती कोगनोळी चेकपोस्टसह विविध ठिकाणच्या आंतरराज्य चेकपोस्टना भेट देऊन पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त सूचना केली. जिल्ह्यात प्रवेश करणार्या परराज्यातील प्रवाशांकडे 72 तासाच्या आत तपासणी केलेले आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र आहे की नाही? याची सक्त तपासणी व्हावी.
तसेच ज्यांच्याकडे सदर प्रमाणपत्र असेल त्यांना जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तातडीच्या कामासाठी अथवा अन्य महत्त्वाच्या कारणास्तव राज्याच्या सीमावर्ती गावातील नागरिकांकडे एखाद्यावेळेस आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर त्यांची चेकपोस्टच्या ठिकाणी व्यवस्थित नोंद करून घेऊन रॅपीड अँटिजन टेस्ट करावी आणि मग त्यांना प्रवेश दिला जावा, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
चेकपोस्टच्या ठिकाणी नियुक्त महसूल, आरोग्य आणि पोलिस खात्याच्या पथकांनी डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य पार पाडावे. सरकारच्या मार्गदर्शक सूचीनुसार प्रवाशांची काटेकोर तपासणी करावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कर्नाटक -महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील कोगनोळी चेकपोस्ट, कागवाड चेकपोस्ट, निपाणी शहर चेकपोस्ट, मंगसुळी आणि अथणी तालुक्यातील चेकपोस्टना भेटी देऊन जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी स्वतः जातीने तेथील आंतरराज्य प्रवाशांची तपासणी प्रक्रिया नजरेखालून घातली. याप्रसंगी निपाणी, अथणी, कागवाड आदींसह इतर तालुक्याचे तहसीलदार, आरोग्य खात्याचे अधिकारी आणि पोलीस खात्याचे अधिकारी उपस्थित होते.