संयुक्त महाराष्ट्रासाठी सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज कोरोनाचे नियम पाळून शहरातील हुतात्मा चौक येथे गांभीर्याने पार पडला.
शहरातील हुतात्मा चौक येथे आज 17 जानेवारी सोमवारी सकाळी आयोजीत अभिवादनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या हस्ते सिमालढ्यातील हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पचक्र वाहण्यात आले. याप्रसंगी अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे, बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आदी घोषणा देण्यात आल्या.
त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांपैकी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, सुनील देसुरकर, दैनिक तरुण भारतच्या कार्यकारी संचालिका रोमा ठाकूर, नगरसेविका वैशाली भातकांडे, वर्षा आजरेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, राजकुमार बोकडे आदींनी हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हुतात्मा चौकातील कार्यक्रमानंतर शहरातील अनसुरकर गल्ली आणि किर्लोस्कर रोड येथे हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना त्याठिकाणी जाऊन अभिवादन करण्यात आले.
अनसुरकर गल्ली येथे हौतात्म्य पत्करलेल्या मधु बांदेकर यांना रोमा ठाकूर आणि नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्याप्रमाणे किर्लोस्कर रोड येथील हुतात्म्यांना नगरसेवक शिवाजी मंडोळकर आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली. सिमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाची सांगता पुन्हा हुतात्मा चौक येथे झाली.
याप्रसंगी बोलताना दीपक दळवी म्हणाले की, गेल्या 66 वर्षांपूर्वी या हुतात्म्यांनी आम्हा मराठी भाषिकांच्या भवितव्यासाठी आपलं रक्त सांडलं. त्यानंतर आजतागायत आपण मराठी संस्कृती आणि भाषेच्या रक्षणासाठी लढत आहोत आणि सदोदीत लढत राहिल पाहिजे. या हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करलेल्यानंतर आजतागायत 66 वर्षे वेगवेगळ्या मार्गाने आपण लढा देत आहोत, परंतु म्हणावे तसे यश येत नाही. आमच्यासमोर अनेक अडचणी निर्माण केल्या जात आहेत, बंदी घातली जात आहे. आम्हाला सीमेवर गोळ्या घालाव्यात अशा तऱ्हेचे अतिरेकी विचार मांडणाऱ्या या सरकार समोर समर्थपणे ताकदीने जो मराठी भाषिक उभा आहे या सर्वांना हुतात्म्यांनी जे रक्त सांडले त्याची जाण आहे. तेंव्हा कोणत्याही परिस्थितीत उद्दिष्टे साध्य केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही, अशा तऱ्हेची आण 17 जानेवारी 1956 साली आपण घेतली आ.हे आजपर्यंत त्यापासून प्रतारणा केलेले नाही. अनेक जण आम्हाला सहकार्य करायला उभे राहिले ते करताना अनेक जण अस्तंगत झाले असे सांगून दळवी यांनी सिमा लढ्यात समितीसह मराठी भाषिकांना मार्गदर्शन करणारे ऋषितुल्य नेते एन. डी. पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती यावेळी दिली.
देवाकडे एकच प्रार्थना की ज्या लोकांनी आम्हाला ताकद दिली. ज्यांनी आमच्यात मराठीपणाने लढण्याची हिम्मत जागवली, अशा नेत्यांना आमचा लढा यशस्वी होईपर्यंत आम्हाला साथ देण्यासाठी आमच्या सोबत ठेवण्याची कृपा करावी असे सांगून आमच्यावर कितीही बंधन अटी -नियम घातले जात असले तरी घटनेच्या चौकटीत नियमांचे पालन करत शेवटपर्यंत हा लढा यशस्वी होईपर्यंत आम्ही लढणार म्हणजे लढणारच, असा निर्धार दीपक दळवी यांनी शेवटी व्यक्त केला. कोरोनाचे नियम पाळून आयोजित केलेल्या या या हुतात्मा दिन कार्यक्रमास दळवी यांच्यासह मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, किरण गावडे आदींसह समिती आणि शिवसेनेचे अन्य पदाधिकारी सदस्य तसेच मराठीभाषिक बहुसंख्येने उपस्थित होते. रणजीत चव्हाण -पाटील यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.