बेळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एतिहासिक हुतात्मा चौक आणि बारा गडगड्याच्या विहिरीसमोर सध्या मोठ्या प्रमाणात कचर्याचा ढिगारा साचल्याने या दोन्ही स्मारकांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात या पद्धतीने निर्माण झालेल्या अस्वच्छतेबद्दल नागरिकांसह दुकानदारांनामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहराची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या रामदेव गल्ली व किर्लोस्कर रोड या ठिकाणच्या हुतात्मा चौकातील साफसफाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे सध्या याठिकाणी प्रचंड कचरा साचला आहे. या कचर्याच्या ढिगार्यामुळे ऐतिहासिक हुतात्मा स्मारक आणि बारा गडगड्याच्या विहिर परिसराला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा व घाण पडलेली असतानाही महापालिकेच्या आरोग्य खात्याचे याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल ये -जा करणाऱ्या नागरिकांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
सदर कचर्याच्या ढिगार्यामुळे हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाचे पावित्र्य धोक्यात तर आलेच आहे, शिवाय कचऱ्यामुळे या भागाला ओंगळ स्वरूप प्राप्त होऊन दुर्गंधी पसरली आहे. परिणामी आसपासचे रहिवासी आणि दुकानदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर कचर्याचा ढिगारा आज दुपारी 12 वाजेपर्यंत तसाच रस्त्यावर पडून असल्यामुळे कुत्री आणि जनावरे त्यात अन्न शोधत फिरत होती.
त्यामुळे रस्त्यावर पसरलेल्या या कचऱ्याचा रहदारीलाही विशेष करून पादचाऱ्यांना त्रास होत होता. या कचर्याच्या ढिगार्यातची वेळेवर उचल न होण्यास महापालिका जबाबदार असल्यामुळे नागरिक व दुकानदार मनपा अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडताना दिसत आहेत. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी विशेष करून या भागाच्या आमदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन साचलेल्या कचऱ्याची तात्काळ उचल करण्याचे आदेश द्यावेत.
त्याचप्रमाणे हुतात्मा स्मारक आणि बारा गडगड्याच्या विहिरीचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी कचरा साचण्यांच्या या प्रकाराची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घेतली जावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.