कोरोना प्रादुर्भाव आणि सध्याची कडाक्याची थंडी अशा प्रतिकूल वातावरणात रस्त्याकडेला उघड्यावर जीवन कंठणाऱ्या एका निराधार वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांनी आज पोलिसांच्या मदतीने सरकारी निवारा केंद्रात आसरा मिळवून दिला.
मठ गल्ली येथील एक निराधार वृद्ध इसम शनी मंदिरकडील रविवार पेठेच्या कोपऱ्यावर उघड्यावर रस्त्याकडेला वास्तव्यास होता.
सध्याच्या कडाक्याच्या थंडीत घराचे छप्पर हरवलेल्या त्या इसमाबद्दल काळजी वाटू लागल्याने आसपासचे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काल त्या इसमाची भेट घेऊन विचारपूस केली आणि तब्येतीच्या दृष्टिकोनातून त्याला सरकारी निवारा केंद्रात स्थलांतरित होण्याची विनंती केली.
त्या वृद्धाने मान्यता देताच पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी आणि खडेबाजार पोलिसांच्या सहकार्याने सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर, सुरेंद्र अनगोळकर आणि अवधूत तुडवेकर यांनी संबंधित निराधार वृद्धाला आज मंगळवारी खासबाग येथील सरकारी निवारा केंद्रात नेऊन दाखल केले.
वृद्धांला निवारा केंद्रात घेऊन जाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील यांनी आपली रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. याबद्दल संतोष दरेकर यांनी पोलिसांसह शंकर पाटील यांचे आभार मानले आहेत.