स्थानिक लोकप्रतिनिधीचे आणि स्वच्छता ठेकेदाराच्या दुर्लक्ष पणाने भारतनगर सेकंड क्रॉस गोल्लर चाळीचा रस्ता सध्या अस्वच्छतेचे माहेर घर बनल्यामुळे नागरिकात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
भारतनगर सेकंड क्रॉस गोल्लर चाळीचा रस्ता सध्या अस्वच्छतेचे माहेर घर बनला आहे. या रस्त्याच्या तोंडावर कायम कचर्याचा ढिगारा साचलेला असतो. केरकचरा आणि घाणीची वेळच्यावेळी उचल केली जात नसल्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरणाबरोबरच या ठिकाणी बेवारस कुत्री आणि डुकरांचा उपद्रव वाढला आहे.
यात भर म्हणजे या भागाच्या स्वच्छतेचा ठेका ज्याच्याकडे आहे तो ठेकेदार गोल्लर चाळीतच राहतो. त्यामुळे तो आपल्या कचरा उचल करणाऱ्या सर्व गाड्या चाळीतील रस्त्यावर उभ्या करतो. परिणामी गल्लीतील अन्य वाहनचालकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. त्याचप्रमाणे कचऱ्याची विल्हेवाट लावून आलेल्या गाड्या पाण्याने धुऊन स्वच्छ न करता भरवस्तीत रस्त्यावर तशाच उभ्या केल्या जात असल्यामुळे संपूर्ण गल्लीत विशेषत: रात्रीच्या वेळी असह्य दुर्गंधी पसरलेली असते. यामुळे येथील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आले असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
यासंदर्भात वारंवार तक्रार करून देखील या भागाचे लोकप्रतिनिधी अथवा स्वच्छता ठेकेदार त्याची दखल घेत नसल्यामुळे नागरिकात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गोल्लर चाळीचा परिसर प्रभाग क्र. 28 आणि 39 मध्ये येतो. तक्रार करण्यास गेलेल्या नागरिकांशी स्वच्छता ठेकेदार गोल्लर हा उद्धट व अरेरावीची भाषा वापरत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
दोन्ही प्रभागांच्या नगरसेवकांना स्वच्छता ठेकेदाराने आपल्या खिशात घातले असल्यामुळेच त्याच्याकडून हे धाडस होत असल्याचे बोलले जाते. तरी लोकप्रतिनिधींसह महापालिका आयुक्तांनी याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच गोल्लर चाळीतील कचरा वेळच्यावेळी उचलण्याचा आदेश देण्याबरोबरच संबंधित कंत्राटदाराला त्याच्या कचऱ्याच्या गाड्या अन्यत्र खुल्या जागेत उभ्या करण्याची सक्त ताकीद दिली जावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जाते.