बेळगाव महापालिकेची निवडणूक केल्या 6 सप्टेंबर 2021 रोजी पार पडली आणि 58 प्रभागांपैकी 35 प्रभागांमध्ये विजय संपादन करून भारतीय जनता पक्षाने महापालिकेवर वर्चस्व मिळवले. अधिकृत गॅजेटद्वारे तसेच जाहीरही करण्यात आले. मात्र तेंव्हापासून आजतागायत निवडून आलेल्या नगरसेवकांचा ना शपथविधी झाला, ना महापालिकेची पहिली बैठक झाली.
कर्नाटक म्युन्सिपल कायद्याच्या कलम 42 नुसार प्रत्येक महापालिकेला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असलाच पाहिजे. कायद्यातील उपकलमानुसार (2ए) विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी निवडून आलेल्या नव्या सदस्यांमधील दोघा सदस्यांची अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड झाली पाहिजे.
त्याचप्रमाणे अध्यक्ष अथवा उपाध्यक्षांच्या प्रासंगिक रिक्त पदासाठी निवडून आलेल्या नगरसेवकांमधून अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष पदासाठी निवड केली जावी. याखेरीज महापालिका सभागृहाची दरमहा एक तरी बैठक घेतली जावी. मात्र यापैकी बेळगाव महापालिकेच्या बाबतीत काहींही घडलेले नाही.
बेळगावच्या इतिहासात प्रथमच महापालिकेची निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढवली गेली. त्यामध्ये भाजपने बहुमत मिळवले असले तरी आतापर्यंत महापालिकेची ना बैठक झाली, ना महापौर पदाची निवड. त्यामुळे हे असे का? असा संभ्रम शहरवासीयांना पडला आहे.
यासाठीच त्यावर टीका करताना आज केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव दक्षिणचे आमदार आणि बेळगाव उत्तरचे आमदार यांच्या स्वरूपात बेळगाव महापालिकेला केंव्हाच अनुक्रमे ‘महापौर’ आणि ‘उपमहापौर’ मिळाले आहेत असे म्हंटले आहे.