कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावातील अधिवेशनाच्या निषेधार्थ आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्याप्रसंगी दीपक दळवी यांना काळे फासणाऱ्या संपतकुमार यांच्यासह अन्य तीन जणांना बेळगावच्या आठव्या जेएमएफसी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
महाराष्ट्रात सामील होण्याची आपली इच्छा व्यक्त करण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली बेळगावातील कर्नाटक सरकारच्या प्रत्येक अधिवेशनात प्रसंगी महामेळाव्याचे आयोजन करतात. त्या अनुषंगाने मागील वर्षी आयोजित हा मेळाव्याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना कन्नड कार्यकर्त्यांनी काळे फासले होते.
दळवी यांना काळे फासणाऱ्या संपतकुमार यांच्यासह अन्य चार जणांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र आता या 4 जणांना बेळगावच्या 8 व्या जेएमएफसी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान काळे फासण्याचे अतिशय भेकड आणि समाजात असंतोष पसरवणारे काम करणाऱ्या समाजकंटकांची कारागृहातून सुटका होणार असल्यामुळे तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विटंबनेच्या निषेधार्थ रस्त्यावर लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे 37 शिवप्रेमी राष्ट्रभक्त निरपराध मराठी युवक अद्यापही हिंडलगा कारागृहात बंदिवासात असून त्यांचा जामीन जिल्हा न्यायालयाने नाकारला आहे.
त्यामुळे दोन्ही प्रकरणातील विसंगतीबद्दल नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत असून एकंदर प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.