रस्ता चुकल्याने असहाय्य निराधार अवस्थेत रस्ता कडेला पडून असलेल्या भटिंडा पंजाब येथील एका वृद्ध इसमाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलासा देताना त्याला त्याच्या गावी माघारी पाठवून देण्याची व्यवस्था केल्याची घटना काल घडली.
याबाबतची माहिती अशी की, फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांना कॅम्प फिश मार्केटनजीक रस्त्याकडेला एक वृद्ध इसम बेवारस झोपल्याचे आढळून आले. त्यांनी त्याची विचारपूस केली त्यावेळी त्या इसमाने आपले नांव परमिंदर सिंग असे असून आपण भटिंडा पंजाब येथील आहोत. माझा रस्ता चुकल्यामुळे ट्रक ड्रायव्हर मला येथे मध्येच सोडून गेला आहे. माझ्याकडील पैसे वगैरे सर्व कांही काढून घेण्यात आले आहे, असे सांगितले. तेंव्हा संतोष दरेकर यांनी लागलीच श्रीराम सेना हिंदुस्तानच्या रुग्णवाहिकेची संपर्क साधला.
त्यानुसार अमर कोलकार व संतोष जुवेकर हे रुग्णवाहिका घेऊन तात्काळ कॅम्प येथे दाखल झाले. त्यानंतर असहाय्य परमिंदर सिंग यांना प्रथम खासबाग येथील निराश्रितांच्या सरकारी निवारा केंद्रात हलविण्यात आले. त्यानंतर काल रविवारी सायंकाळी पोलिसांच्या मदतीने निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वेने त्यांची त्यांच्या गावी रवानगी करण्यात आली.
याबद्दल संतोष दरेकर यांनी पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांच्यासह खडेबाजार पोलीस आणि रेल्वे पोलिस तसेच सरकारी निवारा केंद्राचे प्रमुख शंकर बी. एम., डॉ. रोहित जोशी, बेळगाव केसरीचे संपादक गणपत पाटील, प्रमोद शर्मा यांनी रेल्वे तिकीट, जेवणखान बस, तिकीट आदी स्वरूपात मदत करून परमिंदर सिंग यांची त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करण्यास सहकार्य केल्याबद्दल आभार मानले आहेत.