बेळगाव शहरातील क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना आणि ध संभाजी चौक परिसरात दगडफेक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शहरातील निरपराध युवक आणि कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी सलग दुसऱ्या दिवशी बेळगावच्या माजी नगरसेवक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
माजी नगरसेवक संघटना बेळगावच्या शिष्टमंडळाने आज सकाळी माजी महापौर किरण सायनाक व शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
जिल्हाधिकार्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. शहरातील मार्केट, खडेबाजार आणि कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये खोटे गुन्हे दाखल करून निरपराध युवक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, माजी महापौर उपमहापौर आणि वकिलांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आपण पोलीस आयुक्तांच्या सहकार्याने योग्य सखोल चौकशी करावी. योग्य पद्धतीने व्यवस्थित तपास न करता संबंधित सर्व निरपराध्यांना अटक करण्यात आल्यामुळे खरे गुन्हेगार समाजकंटक खुलेआम समाजात वावरत आहेत.
याखेरीज भादवि 124 आणि 307 कलमान्वये पात्र असलेला एकही गुन्हा संबंधितांनी केलेला नाही. कोणताही गुन्हा केलेला नसताना अवैधरित्या अटक झाल्यामुळे संबंधित निरपराध युवक, सामाजिक कार्यकर्ते, माजी महापौर, उपमहापौर आणि वकिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेंव्हा कृपया याची गांभीर्याने दखल घेऊन खऱ्या गुन्हेगार समाजकंटकांना गजाआड करावे आणि अटक केलेल्या संबंधित सर्वांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांची मुक्तता करावी ही विनंती, अशा आशयाचा तपशील माजी नगरसेवकांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अटकेची कारवाई कशी चुकीची आहे हे थोडक्यात पटवून दिले. याप्रसंगी माजी महापौर सायनाक आणि सुंठकर यांच्यासह माजी महापौर मालोजीराव अष्टेकर माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, ॲड. रतन मासेकर, विनायक गुंजटकर आदी उपस्थित होते.