छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळा विटंबनेनंतर बेळगावात झालेल्या दगडफेक की प्रकरणी अटक करण्यात आलेल्या निरपराध मराठी युवक आणि हिंदू कार्यकर्त्यांवरील गुन्हे सरकारने त्वरित मागे घ्यावेत आणि जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना गजाआड करून कठोर शासन करावे, अशी मागणी बेळगावच्या माजी नगरसेवक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बेळगावच्या माजी नगरसेवक संघटनेने आज सोमवारी सकाळी अध्यक्ष माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यक आणि निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव शहर परिसरात कांही समाजकंटकांनी बेळगावची शांतता भंग करण्यासाठी महापुरुषांचा अवमान करण्यास सुरुवात केली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिवीर संगोळी रायण्णा या थोर प्रेरणादायी महापुरुषांचा अपमान केला गेला. त्यानंतर आंदोलने झाली. त्याचे पडसाद कर्नाटक विधानसभा व महाराष्ट्र विधानसभा तसेच केंद्रात देखील उमटले. परंतु या सर्व प्रकरणी जे कार्यकर्ते सामाजिक कार्यात अग्रेसर होऊन काम करत होते, मग ते हिंदू धर्मासाठी असो वा अन्य धर्मासाठी. या सर्वांनी कोरोना प्रादुर्भाव काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली आहे. मात्र अशा या निरपराध कार्यकर्त्यांना आज जेलमध्ये डांबण्यात आले आहे. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरी सरकारने या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करून निरपराध कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि थोर महापुरुषांचा अपमान करणाऱ्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. महाराष्ट्र एकीकरण समितीचे तसेच हिंदू संघटनेचे कार्यकर्ते हे निर्दोष असल्याकारणाने आम्ही सर्व माजी नगरसेवक आपल्याला या निवेदना मार्फत विनंती करत आहोत की त्यांची लवकरात लवकर सुटका करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी ॲड. सातेरी यांच्यासह माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शिवाजी सुंठकर, महेश नाईक, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर, आर. एस. बिर्जे, वैशाली हुलजी, सुधा भातकांडे आदींसह बहुसंख्य माजी नगरसेवक उपस्थित होते.