सहकारी संस्था स्थापन करून, नागरिकांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून, पैसे लाटणाऱ्यांच्या डोक्यावर ई डी घोंगावत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे.
बेळगावात अनेक सोसायट्यांनी फसवणुकीचा मार्ग सुरू केला असून त्यांच्या विरोधात नेमकी तक्रार कुठे करावी असा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र आता गुंतवणूकदारांनी सहकार खात्याच्या बरोबरीनेच इडी कडे धाव घेऊन कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकी संदर्भात आपले गा-हाणे मांडण्यास सुरुवात केल्यामुळे सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपली मालमत्ता वाढवणाऱ्यांना चांगलाच चाप बसू लागला आहे.
संगोळी रायन्ना सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पूगोळ यांच्यावर झालेली कारवाई हे याचेच द्योतक म्हणता येईल. आनंद अप्पूगोळ यांच्यावर सहकार खाते, ग्राहक न्यायालय आणि इतर कोर्टात 250 कोटी च्या फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्या संदर्भात कारावास आणि इतर कारवाई होत होती.
जामिनावर बाहेर असतानाच ईडीने त्यांच्यावर कारवाई केली असून अटक करून बेंगलोरच्या विशेष न्यायालयासमोर सादर करण्यात आले. त्यानंतर त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे फसवणूक करून हात वर करता येणे साधे सहज सोपे नाही हेच आता स्पष्ट बनले आहे. राजकीय क्षेत्रात फायदा मिळवण्याच्या उद्देशाने सहकार क्षेत्रात दाखल होऊन मोठी माया मिळवत गब्बर बनणाऱ्यांना यामुळे चांगलीच चाप बसू लागली आहे.
बेळगावातील अनेक संस्था ई डी च्या रडारवर असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रामाणिक सेवा देणाऱ्यांची साधारण चौकशी आणि इतरांवर कारवाईचा बडगा असे स्वरूप बनत चालल्याने सहकार क्षेत्र हादरले आहे.