बेळगाव शहरातील संगमेश्वरनगर येथील एपीएमसी मार्केट यार्डकडे जाणाऱ्या डबल रोड अर्थात दुपदरी मार्गावरील पथदीपांकडे लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून हा रस्ता रात्री अंधारात बुडत असल्यामुळे दुरुस्ती करून पथदीप पूर्ववत प्रज्वलित करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
संगमेश्वरनगर येथील मार्केट यार्ड कडे जाणाऱ्या दुपदरी रस्त्यावरील पथदीप गेल्या सुमारे दोन महिन्यापासून बंद अवस्थेत आहेत बेळगावातील विधीमंडळाचे अधिवेशन समाप्त झाल्यानंतर अल्पावधीत बंद पडलेले सदर मार्गावरील सर्व पथदीप अद्यापही प्रज्वलित झालेले नाहीत याबाबत वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही.
स्थानिक नागरिकांनी या भागाच्या नगरसेवकांसह खुद्द आमदारांकडे तक्रार करून देखील अद्यापही कोणतीच कार्यवाही झाली नसल्यामुळे नागरिकांत तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आपली जबाबदारी समजत नाही का? असा संतप्त सवाल केला जात आहे.
सदर श्री बसवाण्णा मंदिरापासून ते बेळगाव एपीएमसी भाजी मार्केट यार्ड पर्यंतच्या या रस्त्यावर नेहमी रहदारी असते. या भागातील नागरिकांसह तालुक्यातील कंग्राळी खुर्द, कडोली आदी गावातील शेतकरी, विद्यार्थी आणि गावकऱ्यांचा या रस्त्यावर कायम वावर असतो. सदर डबल रोड शेजारी अनेक दुकाने, कार्यालयं, आस्थापने देखील आहेत, शिवाय बाबू जगजीवन राम उद्यान हे उद्यान देखील आहे. अशा या प्रमुख रस्त्यावर गेल्या सुमारे दोन महिन्यापासून पथदीपांअभावी सायंकाळनंतर रात्रीच्या वेळी संपूर्ण अंधाराचे साम्राज्य असते.
हा अंधार आणि भरीस भर म्हणून खराब झालेला रस्ता यामुळे अपघाताचा धोका तर वाढलाच आहे शिवाय नागरिकांमध्ये चोराचिलटांची भीतीही वाढली आहे. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आवश्यक दुरुस्तीचे आदेश देऊन या रस्त्यावरील पथदीप पूर्ववत सुरू करावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.