बेळगाव शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या हेल्प फाॅर नीडी, फुड फाॅर नीडी आणि एज्युकेशन फाॅर नीडी या प्रकल्पाअंतर्गत केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हे कार्य अधिक प्रभावी व्हावे यासाठी रोटरी क्लब ऑफ वेणू ग्रामतर्फे या संस्थेला रुग्णवाहिका देणगीदाखल देण्यात आली आहे.
सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र अंगोळकर हे हेल्प फाॅर नीडी, फुड फाॅर नीडी व एज्युकेशन फाॅर नीडी प्रकल्पांचे संस्थापक आहेत. या तीन प्रकल्पाअंतर्गत समाजातील गोरगरीब गरजूना सातत्याने मदत केली जाते. गेल्या दोन वर्षातील कोरोना महामारीच्या काळात या प्रकल्पांअंतर्गत असंख्य कोरोनाग्रस्त रुग्णांना, फेसमास्क, नेब्युलायझर, व्हील चेअर, वॉकर्स, ऑक्सीजन सिलिंडर्स, सनीटायझर्स आदी पुरवण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे रुग्णांना घरापासून हॉस्पिटल पर्यंत ने-आण करण्यासाठी हेल्प फाॅर नीडीच्या माध्यमातून मोफत रुग्णवाहिका सेवा देखील पुरवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हेल्प फोर नीडीचे कार्यकर्ते जखमी अपघातग्रस्तांना मदत करण्याबरोबरच एखाद्या या निराधारांच्या अंत्यसंस्कारासाठी देखील पुढाकार घेत असतात. कोरोनामुळे मृत पावलेल्या कांही उपेक्षितांवर देखील त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.
मानवतेच्या दृष्टिकोनातून केल्या गेलेल्या या सर्व निस्वार्थ सेवेची दखल घेऊन द रोटरी क्लब ऑफ वेनोग्रामतर्फे सुरेंद्र अनगोळकर यांच्या सेवाभावी कार्यासाठी एक रुग्णवाहिका देणगीदाखल देण्यात आली.
यासंदर्भातील सामंजस्याची कागदपत्रे रोटरी वेणूग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच सुरेंद्र अनगोळकर यांच्याकडे हस्तांतरित केली. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावचे अध्यक्ष अरविंद खडबडी, सेक्रेटरी विनयकुमार बाळीकाई, अशोक पाटील, महेश अनगोळकर, उमेश रामपुरवाडी, अनिल अष्टेकर आदी उपस्थित होते. रुग्णवाहिका देणगीदाखल दिल्याबद्दल सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनने आभार प्रकट केले आहेत.