फक्त एन. डी. साहेब या नावातच दरारा होता. सीमाभागात फक्त एन. डी. या दोन अक्षरांचा उल्लेख झाला तरी समजतं, मराठी भाषिक सतर्क होतो व स्वाभिमानाने व ताठ मानेने कार्यास लागत होतो. कोणत्याही परिस्थितीत मराठी भाषिकांना न्याय मिळवून देणारच असा दुर्दम्य विश्वास ठेवून लढ्यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन लाठीकाठी खातो, तुरुंगात जाऊन वास्तव्य करतो, मराठी भाषिकांचा पाठपुरावा करत लढा लढत रहा यश निश्चित आहे असे आश्वासन उद्गार काढणारा एक दुर्दम्य लढाऊ नेतृत्व आज एन. डी. साहेबांच्या रुपाने काळाच्या पडद्याआड गेले.
एन. डी. साहेबांचे नांव सर्वदूर असल्याचे माहीत होते. सुरुवातीस लांब राहूनच मी त्यांची भाषणे ऐकली. मी एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून अनेक वर्षे वावरत होतो. माझ्या या आंदोलनातील सक्रिय सहभाग हा एक अपघात होता. सर्व तरुण एकत्र करून मी एक ऐतिहासिक पदमोर्चाचे आयोजन केले. बेळगाव ते मुंबई असा पदमोर्चा यशस्वी झाला. हा मोर्चा अनेक मतमतांतरे असूनही मा. एन. डी. पाटील यांनी आम्हा मोर्चेकऱ्यांसोबत राहून कोल्हापूर जवळील तांदुळवाडीत आमच्या जेवणाची व राहण्याची सोय केली. निरपेक्ष भावनेने दिलेला हा आशीर्वाद व प्रोत्साहन हे महत्त्वाचे ठरले. एन. डी. साहेब सदोदित लढणाऱ्यांच्या मागे उभे राहतात. सरकार दरबारी आवाज उठवत साऱ्या समाजाचे समाजाने यश खेचून आणावे या विचाराने ते पक्के. त्यामुळे सुरुवातीस सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करावा या विचाराच्या विरोधातील पण उच्चस्तरीय समितीने व माननीय चंद्रचूड यांच्या विचाराने तसेच सीमाभागातील सततच्या पाठपुराव्याने या लढावृत्तीच्या नेत्याने आपला विचार बाजूला सारून मना विरोधात सीमाप्रश्नाचा दावा दाखल करण्यास अनुमती दिली.
मा. शरद पवार साहेबांची चर्चा करताना मी सरकार व कै. बाळासाहेब ठाकरे यांना समजावून मान्यता मिळवली. पण एन. डी. यांचे मन वळविणे व मान्यता मिळवणे सर्वस्वी समिती नेतृत्वाचे काम आहे असे सांगितले होते. इतके कठोर एन. डी. सर्वसामान्य जनतेचा विचार असल्यास माझी आडकाठी नको म्हणून विचारास मुरड घालणारे मोठ्या मनाचे लढाऊ नेते होते. आजही आम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढत होतो. उच्चाधिकार समितीचा निर्णय झाला पण कोर्टात जाण्याचे पुढील कामकाज कोण करणार? हा प्रश्न होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी एन. डी. यांचे नांव सुचवले. एन.डी. साहेब सह्याद्रीतच होते. तेंव्हा मी मुख्यमंत्र्यांना एन. डी.शिवाय आमचे कोणी तारणहार नाही असे सांगितले. एन. डी. साहेबांनी आम्हा सर्वांना आपल्या खोलीत बोलावून चर्चा करून जबाबदारी स्वीकारली एन. डी. साहेबांनी यात कोणास घ्यावे? अशी विचारणा करताच मीच ॲड. भांडारे व वालावलकर अशी दोन नावे सुचवली. पण कालांतराने या दोघांचाही हवा तसा उपयोग झाला नाही. अशा सगळ्या संघर्षमय अस्थिर वातावरणात एन. डी. स्थिर राहिले होते.
अशा अनेक अडचणी व मनस्तापाला सामोरे जात आजपर्यंत साहेबांचा याप्रश्नी सहभाग आम्हा सीमा बांधवांना मोलाचा होता. लढा लढणारी प्रत्येक व्यक्ती त्यांना हवी असते. मतभेद असले तरी लढणाऱ्याला पाठबळ देणे हा त्यांचा स्थायीभाव. आम्ही साऱ्या खासदारांना भेटण्यास सदोदित दिल्लीला जात असे. त्यावेळी त्यांनी अत्यंत आपुलकीने मला हाक मारून जवळ बोलावले. घाबरतच मी सामोरा गेलो माझी चौकशी केली कोण कोण भेटले? काय संवाद झाला? कांही गरज असल्यास माझ्याशी संपर्क करा. तुम्हाला युवकांना यश मिळो. खासदारांना अधिक कांही सांगायचे असल्यास मी देखील थांबेन असे त्यांनी आश्वासन दिले. त्यावेळी शंकराव चव्हाण गृहमंत्री होते. सुशीलकुमार शिंदे व खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी आम्हाला सार्यांशी चर्चा केली होती. त्यांची माहिती आम्ही एन. डी. साहेबांना दिली. यावेळी खासदार सतीश प्रधान, कै. मधुसूदन वैराळे, दिलीप गांधी इत्यादींनी आम्हास केलेले सहकार्य मार्गदर्शन या संदर्भात साहेबांशी चर्चा केली. पार्लमेंट स्थळी समोरचा फुटपाथ, कोठेही केंव्हाही सीमाप्रश्नी खंबीरपणे उपलब्ध नेता असे एन. डी. पाटील साहेब आमचे दैवत होत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!एनडिंच्या स्वप्नातील महाराष्ट्र पूर्ण करण्यासाठी सीमावासीयांनी प्रयत्न करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल आणि बेळगाव प्रश्न सुटेल त्याचवेळी त्यांना श्रद्धांजली ठरेल-
– दीपक अर्जुनराव दळवी, अध्यक्ष मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती.