बेळगावच्या बांधकाम क्षेत्रात अलिकडे काळाबाजार आणि भेसळीचे प्रमाण वाढले असून खडी व्यावसायिक संपाचे कारण पुढे करून अव्वाच्या सव्वा दराने काळ्याबाजारात बांधकामाच्या खडीची विक्री करत असल्याचा आरोप केला जात आहे.
इमारत वगैरे कोणत्याही बांधकामासाठी खडीची गरज भासते. सध्या शहरात अनेक ठिकाणी बांधकामं सुरू आहेत. या परिस्थितीत खडी व्यावसायिकांच्या संपामुळे बांधकामासाठी आवश्यक खडीचा तुटवडा निर्माण झाला आहे. खडीची मागणी केल्यास व्यवसायिक सध्या आमचा संप सुरू आहे तेंव्हा खडी मिळणार नाही, असे सांगत आहेत. परिणामी खडी अभावी बांधकाम व्यावसायिकांची गैरसोय होत असून कांही ठिकाणी कामे थांबून राहिली आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेतली असता खडी व्यावसायिकांकडून बांधकामासाठी खडी देण्यास नकार दिला जात असला तरी प्रत्यक्षात हे व्यवसायिक मागील दाराने अव्वाच्या सव्वा दर आकारून खडीचा पुरवठा करत असल्याचे सांगण्यात येते. याआधी साडेतीन ब्रास खडीचा दर 7,000 ते 7,500 रुपये होता.
आता काळ्याबाजारात त्याची किंमत 10,000 ते 10,500 रुपये इतकी झाली आहे. या पद्धतीने खडीमध्ये काळाबाजार होत आहे तर दुसरीकडे वाळू, विटा आदी बांधकाम साहित्यामध्ये भेसळीचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप केला जात आहे.
वाळूमध्ये शाडू माती किंवा देसूर माती मिसळून भेसळ करण्याबरोबरच वाळू आणि खडीच्या प्रमाणात फसवणूकही केली जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. एकंदर या सर्व प्रकारामुळे बांधकामासाठी चोख साहित्य मिळेनासे झाल्यामुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आला असल्याचे बोलले जात आहे.