बेळगाव शहर परिसरासह ग्रामीण भागात गेल्या एक -दोन दिवसापासून थंडी जास्तच वाढू लागली असून सकाळच्या वेळी धुकेही पडू लागले आहे. बेळगाव शहराचे तापमान आज सकाळी 11.9 डिग्री सेल्सिअस इतके घसरले असल्यामुळे भरदुपारी 12 वाजता देखील हवेत गारवा जाणवत होता.
बेळगाव शहर उपनगरासह ग्रामीण भागात आता गुलाबी थंडी पडू लागलेली असून हुडहुडी भरवणाऱ्या या थंडीसह विशेष करून शहराच्या बाह्यांगाला असलेली उपनगरे आणि ग्रामीण भागात पहाटे धुक्याची चादर पसरलेली दिसून येत आहे. बेळगाव परिसराचे सर्वसामान्य कमाल तापमान 28.3 डिग्री सेल्सिअस इतक्या असले तरी आज सकाळी हे तापमान घसरून 11.9 डिग्री सेल्सियस इतके झाले आहे.
थंडी वाढल्यामुळे नेहमीचा पेहराव टाळून गरम कान टोपी, स्वेटर जॅकेट आदी गरम कपडे घालण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी उपनगरांतसह ग्रामीण भागामध्ये सकाळपासून नागरिक शेकोट्या पेटवून ऊब घेताना दिसू लागले आहेत.
यावर्षी हवामानामध्ये वारंवार बदल होताना दिसत आहेत. हिवाळ्यात पाऊस आणि पावसाळ्यात अचानक कडक ऊन आणि आता थंडीसह धुके पडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पहाटेच्या वेळी फिरावयास बाहेर पडणारी मंडळी गुलाबी थंडी आणि धुक्याचा आनंद घेत आहेत.
काल सोमवारी तर पहाटे पडलेल्या धुक्याने जणू पाऊसच पडत असल्याचा अनुभव साऱ्यांना दिला. दरम्यान धुक्यामुळे भाजीपाला तसेच इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता असून कडधान्य पिकाला मात्र हे वातावरण पोषक असल्याचे सांगितले जात आहे.
त्याचप्रमाणे या धोक्यामुळे बेळगुंदी बेकिनकेरे, बिजगर्णी यासह इतर परिसरात असलेल्या काजू पिकाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.