कोरोना आणि ओमिक्राॅनचा वाढता कहर तसेच सध्याचे थंडीचे मुलांच्या आजारांना निमंत्रण देणारे वातावरण याचा गांभीर्याने विचार करून बेंगलोर प्रमाणे बेळगाव शहरासह जिल्ह्यातील शाळा येत्या 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवाव्यात. यासाठी येत्या 17 जानेवारी रोजी इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या वर्ग सुरू करण्याच्या आपल्या आदेशाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती सिटिझन्स कौन्सिल बेळगावने जिल्हाधिकार्यांना केली आहे.
सिटिझन्स कौन्सिल बेळगावच्या शिष्टमंडळाने आज गुरुवारी अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन त्यांना उपरोक्त विनंती वजा मागणीचे निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बेळगाव जिल्ह्यातील शाळा येत्या 17 जानेवारीपासून सुरू होत आहेत. मात्र एकंदर परिस्थिती पाहता ओमिक्राॅन आणि कोरोना प्रादुर्भावाने बेळगाव शहरासह राज्यभरात कहर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पालक वर्ग मुलांना शाळेत पाठवावे की नाही या चिंतेत आहे. कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थिती बरोबरच बेळगावचे तापमान घसरून प्रचंड थंडी पडत आहे.
सर्वसामान्यपणे अशा हवामानात मुले आजारी पडत असतात. तेंव्हा कोरोना संसर्गजन्य परिस्थिती आणि सध्याचे प्रतिकूल हवामान लक्षात घेऊन आणखी किमान 15 दिवस म्हणजे साधारण 31 जानेवारी 2022 पर्यंत बेंगलोरप्रमाणे बेळगावातील शाळा बंद ठेवल्यास हे पाऊल मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हितावह ठरणार आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या सर्व मुलांचे अद्याप पूर्णपणे कोरोना प्रतिबंधक लसीकरणही झालेले नाही. तेंव्हा कृपया आपण आपल्या 17 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा. आपण योग्य तो निर्णय घ्याल याची आम्हाला खात्री आहे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या भेटीची माहिती दिली. आम्ही सध्याची एकंदर परिस्थिती जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्याचप्रमाणे 17 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती जिल्हाधिकार्यांना केली आहे.
ते आमच्या विनंतीचा गांभीर्याने विचार करून जिल्ह्यातील शाळा बंदचा कालावधी 31 जानेवारीपर्यंत वाढवतील अशी आम्हाला आशा आहे असे तेंडुलकर यांनी सांगितले. याप्रसंगी शेवंतीलाल शहा यांच्यासह सिटिझन्स कौन्सिलचे विकास कलघटगी, शेवंतीलाल शाह,वकील एन आर लातूर,अरुण कुलकर्णी, राहुल पाटील सदस्य उपस्थित होते.