कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि आरटी -पीसीआर प्रमाणपत्र असलेल्यांनाच फक्त कर्नाटकात प्रवेश दिला जाईल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 2 जानेवारी रोजी बेंगलोर विमानतळावर बोलताना पत्रकारांना सांगितले.
त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात असून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरचा काल रात्री आरटी -पीसीआर प्रमाणपत्र नसलेल्या प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांना पोलिसांनी माघारी धाडले.
फक्त बेळगाव येथील चेकपोस्टच नाहीतर अन्य सर्व चेकपोस्टच्या ठिकाणी कडक तपासणी हाती घेण्यात आली आहे. सीमेवरील विजयपुरा जिल्ह्याला देखील चेकपोस्टच्या ठिकाणी कडक तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विजयपुरा जिल्ह्यात जवळपास 11 चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत.
या कडक उपाययोजनांमुळे प्रवाशांची गैरसोय होणार असली तरी बेळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने ते अत्यंत गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सरकारकडून आणखी कांही पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. यासंदर्भात आपण उद्या तज्ञांची बैठक बोलावली आहे.
त्यानंतर गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक बोलावून नव्या उपाययोजना अंमलबजावणी संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले आहे.