भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा बेळगाव उत्तर आणि पत्रकार विकास अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने फ्रन्टलाइन वॉरियर्स पत्रकारांसाठी मोफत कोविशिल्ड बूस्टर डोस लसीकरण शिबिराला आज सकाळी उत्साहात प्रारंभ झाला.
शहरातील पार्वती शॉपिंग कॉम्प्लेक्स खडेबाजार कॉर्नर येथील डॉ. भूषण सुतार यांच्या क्लिनिकमध्ये आज मंगळवारी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर पत्रकार विकास अकादमीचे अध्यक्ष प्रसाद प्रभू, बेळगाव उत्तर भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विजय कदम आदी उपस्थित होते. आपल्या उद्घाटनपर भाषणात ॲड. बेनके म्हणाली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात मोफत लसीकरण उपलब्ध करून देऊन जगाला आदर्श घालून दिला आहे. इतका मोठा देश असूनही आपल्या देशात जवळपास 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. कर्नाटकात लसीकरणामध्ये बेळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर जिल्ह्यामध्ये बेळगाव उत्तर मतदारसंघ प्रथम क्रमांकावर आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरणा शिवाय दुसरा पर्याय नाही.
तेंव्हा जनतेला कळकळीची विनंती आहे की सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. फ्रंटलाईन वॉरियर्सनी तर प्राधान्याने लसीकरण करून घेतले पाहिजे. बूस्टर डोस हा फार महत्त्वाचा आहे. कोरोनाचा सध्याचा विषाणू तितका प्रभावी नसला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे असे सांगून यासाठी सर्वांनी सक्तीने मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा आणि सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळावा, असे आवाहनही आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले.
उद्घाटन समारंभास बेळगाव भाजप महानगर ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय कदम,बेळगाव भाजप उत्तर ओबीसी मोर्चा अध्यक्ष विक्रम बाळेकुंड्री भाजप कार्यकर्त्यांसह पत्रकार विकास अकादमीचे अन्य पदाधिकारी व सदस्य तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर बूस्टर डोसच्या स्वरूपातील मोफत लसीकरण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित लाभार्थी पत्रकार बंधूंना बूस्टर डोस देण्यात आला. सदर शिबिर दिवसभर सुरू राहणार असून या ठिकाणी दुसरा डोस घेऊन 9 महिने झालेल्यांना बूस्टर डोस मिळेल. त्याचप्रमाणे ज्यांचा दुसरा डोस झाला नाही त्यांना दुसरा डोस देण्याची सोयदेखील या शिबिरात अंतर्गत करण्यात आली आहे.