Friday, March 21, 2025

/

बिजगर्णी ग्रा. पं. निवडणुकीत गैरप्रकार : ग्रामस्थ संतप्त

 belgaum

बिजगर्णी (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडला असून त्याची सखोल चौकशी केली जावी आणि ग्रामपंचायत निवडणूक पुनश्च नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी बिजगर्णी येथील निवडणूक रिंगणातील उमेदवारांसह समस्त संतप्त गावकऱ्यांनी केली आहे.

ग्रा. पं. निवडणुकीतील गैरप्रकारमुळे संतप्त झालेल्या बिजगर्णीवासियांनी माजी जि. पं. सदस्य मोहन मोरे, विनय कदम आदि नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठ्या संख्येने जमा झालेल्या गावकऱ्यांनी निवडणुकीतील गैरप्रकारांचा निदर्शने करून निषेध केला. त्याचप्रमाणे निवडणूक रिंगणातील महिला उमेदवारांसह अन्य महिलांनी आक्रमक पवित्रा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ठिय्या आंदोलन छेडले.

यासंदर्भात युवा नेते विनय विलास कदम यांनी प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली. बिजगर्णी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात बिजगरणीसह कावळेवाडी, राकसकोप, यळेबैल अशी चार गावं येतात. निवडणूक आयोगाकडून नुकतीच या ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडली आणि मतपेट्या सीलबंद करून स्ट्राँग रूममध्ये धाडण्यात आल्या. मात्र त्यानंतर मतमोजणीप्रसंगी मतपेट्या आधीच उघडण्यात आल्या असल्याचे पोलिंग एजंटांच्या निदर्शनास आले.Bijgarni memo

याबाबत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी मतपेट्या आधीपासून तशाच आहेत असे सांगून वेळ मारून नेली. त्यानंतर मतमोजणी अंती प्रत्येक मतपेटीमध्ये 5 -2 मध्ये मते जास्त असल्याचे आढळून आले. तेंव्हा या संदर्भात देखील पोलिंग एजंटांनी विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तरे देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली. तथापि निदर्शनास आलेला एकंदर सर्व प्रकार कायद्याचे आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन करणारा अत्यंत गैर असल्यामुळे आम्ही यासंदर्भात तहसीलदारांकडे तक्रार करण्यास गेलो होतो. मात्र त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार नोंदवा असे आम्हाला सांगितले. त्यानुसार आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

या निवेदनाद्वारे आम्ही बिजगर्णी ग्रामपंचायत निवडणुकीतील संबंधित गैरप्रकाराची सखोल चौकशी करावी. तसेच ग्रामपंचायत निवडणूक पुनश्च नव्याने घेवून बिजगर्णीवासियांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे, असे विनय कदम यांनी सांगितले.

माजी जि. पं. सदस्य मोहन मोरे यांनी बिजगर्णी ग्रामपंचायत निवडणुकीत घडलेल्या गैरप्रकाराची जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच जे कोण नेतेमंडळी लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकांमध्ये गैरप्रकार करत आहेत त्यांनी ते करू नयेत, अशी माझी विनंती आहे. कारण अशा गोष्टींमुळे जनतेचे आणि विकासकामांचे नुकसान होते. तेंव्हा या प्रकारांना वेळीच आळा घातला जावा, अन्यथा अशा प्रकारांना कंटाळून कोणीही राजकारणात भाग घेणार नाही किंवा विकास कामात सहभाग दर्शवणारी नाहीत असे सांगून बिजगर्णी ग्रामपंचायत निवडणूक पुनश्च नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी मोरे यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.