बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आज सोमवारी पार पडलेल्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि कांही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर रोहित चौधरी हे होते. बैठकीत थकीत वीज बिलासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ आणि स्वतः ब्रिगेडियर चौधरी यांनी हे मुद्दे बैठकीत मांडले. आमदार बेनके यांनी यावेळी बोलताना कॅन्टोन्मेंट कार्यक्षेत्रातील किल्ला येथे असलेल्या दुकानांच्या गाळ्यांचा गैरवापर अध्यक्ष रोहित चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिला. कॅन्टोनमेंटच्या मालकीच्या या दुकानांच्या ठिकाणी चरस, गांजा यासारखे गैरधंदे चालतात असे सांगितले. तसेच संबंधित दुकानांची जागा स्मार्ट सिटी योजनेशी संलग्न करून त्या जागेचा विकास साधण्यात यावा अशी सूचना मांडली.
या सूचनेचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी स्वागत करून त्या अनुषंगाने आवश्यक प्रक्रिया पार पाडण्याची सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कॅंटोनमेंट हद्दीत एलईडी पथदीप बसविण्यात आले असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात एकही बल्ब बसवण्यात आलेला नसल्याचे ब्रिगेडियर चौधरी यांनी बैठकीत स्पष्ट करून नाराजी व्यक्त केली. बैठकीत अन्य कांही मुद्यांवरही महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
दरम्यान, राज्य शासनाकडून एसएफसी अनुदाना अंतर्गत बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाला देण्यात येणारा निधी बंद करण्यात आल्यामुळे कॅन्टोन्मेंटची विद्युत बिलाची रक्कम थकली आहे. परिणामी कॅन्टोनमेंट कार्यक्षेत्रातील पथदीपांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
मात्र आता नगर विकास खात्याने संबंधित अनुदानाची रक्कम पूर्ववत देण्याची तयारी दर्शविल्यामुळे पथदीपांचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्याची विनंती कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने हेस्कॉमकडे करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते. बैठकीस बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विविध खात्यातील अधिकारी उपस्थित होते.