भूसंपादनाच्या मोबदल्यात भरपाई न दिल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्यात आल्यामुळे तेथील कामकाजावर परिणाम झाला असून घडी विस्कटली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयातील खुर्च्या, टेबल, संगणक आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. टेम्पो भरून हे साहित्य न्यायालयीन कोठडी नेण्यात आले आहे. त्याचा परिणाम आता कार्यालयातील दैनंदिन कामकाजावर दिसून येत आहे.
शिरस्तेदारांसह अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना बसण्यासाठी खुर्च्या नाहीत. तसेच संगणकात विविध स्वरूपाची माहिती असली तरी संगणक देखील जप्त करण्यात आल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काम करणे अवघड बनले आहे. एकंदर सध्या प्रांताधिकारी कार्यालयाची घडीच विस्कटली आहे.
सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अन्य प्रकल्पासाठी गेल्या 1980 -81 साली पारिश्वाड (ता. खानापूर) येथील शेतकरी नागाप्पा कुकडोळी यांची सुमारे 5 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. महसूल विभागातर्फे त्याचा मोबदलाही देण्यात आला. मात्र तो अत्यल्प असल्यामुळे जमीन मालकाने न्यायालयात धाव घेतली होती.
त्यानंतर 2019 अखेर 90 टक्के व्याज दराने 66 लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने बजावला होता. मात्र पुन्हा वारंवार आदेश देऊन देखील प्रांताधिकारी कार्यालयाकडून भरपाई देण्यास वेळकाढू भूमिका घेण्यात आल्यामुळे गेल्या 11 जानेवारी 2022 रोजी प्रांताधिकारी कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्यात आली होती.