नव्याने सुरू झालेल्या खासगी होलसेल भाजी मार्केट मुळे वाद पेटला आहे. एपीएमसी मध्ये भाजी मार्केट असताना खासगी भाजी मार्केट ला परवानगी द्यायला नको होती. अशी काही व्यापारी आणि सदस्यांची मागणी आहे. त्यामुळे बुधवारी अधिकारी आणि सदस्यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले.
बेळगाव शहरात खासगी होलसेल भाजी मार्केटला परवानगी का दिली असा प्रश्न करून एपीएमसीतील भाजी व्यापारी आणि शेतकऱ्यांनी एपीएमसी अधिकाऱ्यांना बुधवारी घेराव घातला.
बेळगावात खासगी होलसेल भाजी व्यापाऱ्यांनी उभारलेल्या ‘जय किसान भाजी मार्केट’चे उदघाटन नुकतेच करण्यात आले. आता तेथून होलसेल भाजीविक्री-खरेदीचे व्यवहार सुरु होणार आहेत. त्यामुळे सरकारी मालकीच्या एपीएमसी भाजी मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या व्यापारी आणि शेतकऱ्यांना अडचण होणार आहे.
त्यामुळे सरकारी एपीएमसीमध्ये एक होलसेल भाजी मार्केट असूनही खासगी भाजी मार्केटला परवानगी दिल्याने व्यापारी आणि शेतकरी संतप्त झाले आहेत.
त्याचे पडसाद आज एपीएमसीत उमटले.
आधीच एपीएमसीत भाजी मार्केट असताना पुन्हा खासगी भाजी मार्केटला परवानगी कशी काय दिली असा प्रश्न करत संतप्त व्यापारी-शेतकऱ्यांनी एपीएमसी सचिव डॉ. कोडीगौडा, कृषी उत्पन्न विपणन खात्याचे उपसंचालक महांतेश पाटील, एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम याना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला. खासगी भाजी मार्केटला परवानगी कशी दिली असा प्रश्न करून त्यांनी अधिकारी व अध्यक्षांना भंडावून सोडले.