येळ्ळूर रोड, वडगाव येथील केएलई चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या कमतरतेमुळे होत असलेल्या रुग्णांच्या गैरसोयीबद्दल शहापूरचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी आज केएलई संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कोरे यांची भेट घेऊन चर्चा केली. तेंव्हा कोरे यांनी त्यांना लवकरात लवकर त्या हॉस्पिटलमध्ये पुरेशा डॉक्टरांची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले.
येळ्ळूर रोड, वडगाव येथील केएलई चॅरिटेबल हॉस्पिटल बेळगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील ग्रामीण भागासाठी अत्यंत सोयीचे झाले आहे.
या हॉस्पिटलमध्ये येळ्ळूर देसुर धामणे आदी गावांमधील रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेत असतात. तथापि अलीकडे रात्री-अपरात्री तातडीच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची याठिकाणी पुरेसे डॉक्टर नसल्यामुळे गैरसोय होत आहे.
याबाबतच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन शहापूरचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी आज गुरुवारी केएलई संस्था आणि हॉस्पिटलचे अध्यक्ष प्रभाकर कोरे यांची भेट घेतली.
तसेच त्यांच्याशी चर्चा करून येळ्ळूर रोड येथील हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांची होणारी गैरसोय त्यांच्या कानावर घातली. तेंव्हा कोरे यांनी लवकरात लवकर त्या हॉस्पिटलमध्ये पुरेशा डॉक्टरांची सोय केली जाईल, असे आश्वासन नगरसेवक साळुंखे यांना दिले.