Friday, December 27, 2024

/

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महामेळावा

 belgaum

कर्नाटक सरकारने बेळगावात आयोजित केलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हॅक्सिन डेपो मैदानावर भव्य सीमा महामेळावा घेऊन या अधिवेशनाला विरोध करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे .

मध्यवर्ती चे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्नाटक सरकारने चालवलेल्या या प्रथेविरोधात दरवर्षीप्रमाणे महामेळावा घेऊन निषेध नोंदवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी तसेच इतर घटक समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी कर्नाटकाने काही वर्षांपासून सुरू केलेल्या बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्याच्या प्रथेचा विरोध करण्यात आला. बेळगावच्या मराठी भाषिकांना नेहमीच फसवण्याचा कारभार कर्नाटकाने सुरू केला आहे. विकासाच्या नावाखाली बेळगावात हिवाळी अधिवेशन भरून कोट्यवधीचा खर्च केला जातो. मात्र विकास केला जात नाही .अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज मराठी आणि मराठा म्हणून त्यांना विरोध केला जातो. मात्र अखंड मुस्लिम समाजाच्या विरोधात हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे एकमेव हिंदू राजे म्हणून हे कन्नड लोक शिवाजी महाराजांचा आदर करत नाहीत.

बेंगळुरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा निर्णय जेव्हा झाला त्यावेळी कर्नाटक विधानसभेने त्याला विरोध केला. या पद्धतीने वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांची अवहेलना केली जाते. याचाही तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. मध्यवर्ती चे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी या संदर्भातील आपली भूमिका मांडून महामेळाव्याच्या संदर्भात पोलिस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना आपण जेव्हा भेटू तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल होणाऱ्या अव्हेरलेपणा बाबतही त्यांच्याकडे चर्चा करू अशी माहिती दिली.

Mes meeting
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना बायपास आणि इतर प्रकल्पांच्या माध्यमातून सीमा भागातील शेतकऱ्यांचे हाल करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पिके घेणाऱ्या जमिनींवर जेसीबी फिरून मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू असून हे सारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. या मेळाव्याच्या माध्यमातून याला तीव्र विरोध केला जाईल.

या मेळाव्याला मराठी भाषिक जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहील. अशी माहिती यावेळी अध्यक्ष दीपक दळवी यांनी दिली. कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, राजाभाऊ पाटील याच बरोबरीने इतर अनेक पदाधिकारी व मध्यवर्ती समितीचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.