बेळगाव शहरातील रविवार पेठेतील कलमठ रोड येथील गळती लागलेल्या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम आज मंगळवारी हाती घेण्यात आल्यामुळे स्थानिक व्यापारी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कलमठ रोड येथील खराब रस्ता आणि जलवाहिनी गळती संदर्भात बेळगाव लाईव्हने आवाज उठविला होता.
शहराचे मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या रविवार पेठेतील कलमठ रोड या रस्त्याची पार दुर्दशा होण्याबरोबरच या ठिकाणच्या जलवाहिनीला गेल्या अनेक दिवसापासून गळती लागली होती. परिणामी दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात होते.
या पद्धतीने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्यामुळे सोशल मीडियात व बेळगाव Live वर कलमठ रोड येथील रस्त्यांची दुरवस्था आणि जलवाहिनीच्या गळती संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन आज मंगळवारी तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
रविवार पेठ परिसर हा प्रभाग क्र. 4 आणि 6 यांच्यात विभागला गेला आहे. त्यामुळे या प्रभागांचे नगरसेवक अनुक्रमे संतोष पेडणेकर आणि जयतीर्थ सौंदत्ती यांनी नुकतीच या भागाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या आहेत. आज जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
त्यानंतर येत्या दोन-तीन दिवसात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती कलमठ रोड येथील व्यापारी रामेश्वर भाटी यांनी बेळगाव लाईव्हला दिली. दरम्यान, कलमठ रोड येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून ते बेळगाव लाईव्हला धन्यवाद देत आहेत.