Friday, April 26, 2024

/

‘कर्नाटक बंद’ला बेळगावच्या संघटनांचा पाठिंबा नाही

 belgaum

एमईएस अर्थात महाराष्ट्र एकीकरण समितीला राजद्रोही ठरवून या संघटनेवर बंदी घालावी या मागणीसाठी येत्या 31 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या कर्नाटक बंदला पाठिंबा न देण्याचा निर्णय बेळगावातील विविध कन्नड संघटनांनी घेतला आहे.

बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची गुंडगिरी वाढली असल्यामुळे या संघटनेवर राजद्रोहाचा आरोप ठेवून बंदी घालावी, अशी मागणी कन्नड चळवळीगार वाटाळ नागराज आणि अन्य कन्नड नेत्यांनी केली आहे. तसेच आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी त्यांनी येत्या 31 डिसेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी शहरातील कन्नड साहित्य भवन येथे बेळगावमधील विविध कन्नड संघटनांची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कन्नड संघटना क्रिया समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक चंदरगी हे होते. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीसह शिवसेनेवर बंदी घालावी या मागणीसाठी येत्या शुक्रवार दि 31 डिसेंबर रोजी कर्नाटक बंद पुकारण्यात आला आहे. समितीवर बंदी घालण्यासाठी कर्नाटक बंद हा एकमेव पर्याय नाही. कारण आता सरकारने समितीच्या कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वी कोणत्याही सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरुद्ध इतके कठोर पाऊल उचलले नव्हते. विद्यमान सरकार समितीवर निश्चितपणे कारवाई करेल, जर तसे झाले नाही तर आपण सर्वजण मंत्री, खासदार आदी नेतेमंडळींच्या घरासमोर धरणे सत्याग्रह करू म. ए. समितीवर बंदी घालण्यासाठी सरकारला भाग पाडू, असे अशोक चंदरगी यांनी यावेळी सांगितले.

करवे संघटनेचे राज्य संचालक महादेव तळवार यांनी यावेळी बोलताना वारंवार ‘बंद’ पुकारल्यामुळे राज्यातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यापेक्षा राज्यातील सर्व तालुक्यातील कन्नड कार्यकर्त्यांनी 31 डिसेंबर रोजी बेंगलोर येथे राजभवनच्या ठिकाणी आंदोलन छेडून महाराष्ट्र एकीकरण समितीचा निषेध करावा असे सूचित केले. एकंदर कन्नड संघटनांच्या आजच्या बैठकीत कर्नाटक बंदचे समर्थन न करता विरोध दर्शविण्यात आला. त्यामुळे आता 31 डिसेंबरचा ‘कर्नाटक बंद’ बेळगावात कितपत यशस्वी होतो? हे पहावे लागेल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.