बेंगलोर येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्ती विटंबना घटनेनंतर त्याची तीव्र पडसाद बेळगावात उमटली. कांही ठिकाणी अज्ञातांकडून दगडफेक व तोडफोड झाली. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या श्रीराम सेना जिल्हा अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर माजी महापौर सरिता पाटील व शिवसेनेचे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर आणि युवा समितीचे शुभम शेळके यांच्यावर आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठी भाषिक असल्याने आणि मराठी द्वेषापोटी ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप केला जात असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
बेंगलोर येथे झालेल्या शिवमूर्तीच्या विटंबनेनंतर गेल्या 17 डिसेंबर रोजी रात्री शहरातील छत्रपती संभाजी चौकात बेळगावमधील शिवभक्तकडून संताप व्यक्त करत आंदोलन छेडण्यात आले होते. याच दरम्यान कांही समाजकंटकांनी शहरात दगडफेक केली. या प्रकाराला जबाबदार धरून पोलिसांनी बेळगावातील एकूण 27 मराठी युवकांना अटक केली.
याच वेळी किर्लोस्कर रोडवरील शिवनेरी फोटो स्टुडिओ, बापट गल्ली येथील शांती ग्रँड हॉटेलच्या काचा तसेच स्टेशन रोड जवळ नवरत्न हॉटेल समोर थांबलेल्या सरकारी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी देखील गुन्हा नोंदवताना ‘अज्ञात’ असा गुन्हा दाखल केला होता. मात्र आता त्या अज्ञातांसमवेत रमाकांत कोंडुसकर, सरिता पाटील आणि अन्य दोघांही जबाबदार धरून त्यांच्यावर खडेबाजार पोलिस स्थानकामध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कांही महिन्यापूर्वी समाजकंटकांनी मराठी फलकांची तोडफोड केली होती. त्यावेळी संबंधितांवर जुजबी कारवाई करणारे पोलीस लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या निरपराध मराठी युवकांवर मात्र गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करताना दिसत आहेत. पोलिसांचा हा दुजाभाव आणि दुपट्टी वागणुकीबद्दल शहर परिसरातील मराठी भाषिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.