बेळगावात राज्य विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सुवर्ण विधानसौध येथील शासकीय कार्यालयांचे ठप्प झालेले कामकाज आता पुनश्च पूर्ववत सुरू झाले आहे. तथापि हिवाळी अधिवेशनाचा परिणाम शासकीय कामावर झाला असून त्याचा फटका सामान्यांना बसला आहे.
विधिमंडळ अधिवेशनामुळे बेळगाव सुवर्ण विधानसभा येथील शासकीय कार्यालयांचे कामकाज व्यवस्थित चालले नाही. येथे सेवा बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिवेशन कालावधीत त्यांच्या मंत्रालयात सेवा बजावण्याचे आदेश बजावण्यात आले होते.
जनतेची कामे या दरम्यान बाजूला ठेवण्यात यावीत, अशा मौखिक सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी नियमित कामकाज बाजूला ठेवले होते. कार्यालयातील फायली आणि संगणक देखील बंद ठेवण्यात आल्यामुळे दहा-बारा दिवस ते धूळ खात पडून होते.
सुवर्ण विधानसौध इमारत म्हणजे निरुपयोगी वास्तू हे सर्वश्रुत झाले आहे. अधिवेशना पुरताच या इमारतीचा वापर होत असल्यामुळे सुवर्ण सौधबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यासाठी विविध संस्था आणि संघटनांकडून मंत्रालय स्तरावरील कार्यालय बेळगावला याठिकाणी हलवली जावीत, अशी मागणी केली जात आहे.
तथापि या ठिकाणी केवळ निगम, मंडळ आणि निमशासकीय कार्यालय हलविण्यात आली आहेत. विधिमंडळ अधिवेशन कालावधीत येथील कार्यालयाचे कामकाज बंद असल्यामुळे शासकीय कामकाज सुरळीत चालविताना अडचणी आल्याचे जाणवले होते.