हलगा -मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात आज सोमवारी झालेली न्यायालयीन सुनावणी पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूने झाली असून न्यायालयाने दाव्याचा अंतरिम निकाल जाहीर होईपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवून बायपास रस्त्याच्या कामाला स्थगिती आदेश बजावला आहे. न्यायालयाच्या या सुनावणीमुळे बायपास रस्त्याच्या कामाला आता कायमचा ब्रेक लागला आहे.
हलगा -मच्छे बायपास रस्ता अत्यंत सुपीक जमिनीतून होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या रस्त्याला तीव्र विरोध केला आहे. तथापि असे असतानाही दडपशाही करत शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये जेसीबी घालून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. झिरो पॉइंट निश्चित करण्याबाबत शेतकऱ्यांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केलेली असतानाही न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पोलीस बंदोबस्तात या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. याच्या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सदर याचिकेवर आज आठव्या अतिरिक्त दिवानी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेतकऱ्यांचा दावा गृहीत धरणे योग्य नसल्याचा दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्याचप्रमाणे स्थगिती आदेश मागे घ्यावा यासंदर्भातील प्राधिकरणाचा अर्ज देखील न्यायालयाने नामंजूर केला. याबरोबरच सदर दावा निकालात येईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम पुनश्च हाती घेतले जाऊ नये, असा आदेशही न्यायालयाने बजावला आहे.
शेतकर्यांच्यावतीने आज ॲड. रविकुमार गोकाक यांनी युक्तिवाद करून शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली. यापूर्वी न्यायालयाच्या पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती आदेश कायम राहत होता. मात्र आता संपूर्ण दावा निकालात येईपर्यंत स्थगिती आदेश कायम राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत समाधान व्यक्त केले जात आहे.
शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर नांगर फिरवणाऱ्या प्रशासनाला न्यायालयाच्या या स्थगितीमुळे चाप बसला असून इथून पुढे देखील न्यायालयीन लढ्यात शेतकऱ्यांनी आक्रमकता दाखवून एकजुटीने लढण्याची गरज व्यक्त होत आहे.