कर्नाटकातील भाजप सरकारची गुप्तचर यंत्रणा कोलमडून गेली आहे. त्यामुळे सर्वत्र संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली असून कोणतीही घटना घडण्यापूर्वी गुप्तचर विभागाकडून उपलब्ध माहिती मिळवण्याचे कामच ठप्प झाले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केला आहे.
सध्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे विटंबना आणि काळे फासण्यासारखे प्रकार घडत असून यामागे भाजप सरकारच्या गुप्तचर यंत्रणेतील दोषयुक्त कारभार जबाबदार ठरत आहेत.
कोणतीही घटना घडण्यापूर्वी काय घडणार आहे याची कल्पना गुप्तचर खात्याच्या माध्यमातून सरकारला कळण्याची गरज असते. मात्र सरकार या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे.
गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून समाजकंटकांवर लक्ष ठेवून शांतता आणि सुव्यवस्था तसेच कायदा रक्षणाचे काम सरकारला करावे लागते. मात्र यामध्ये भाजप नेते आणि भाजपचे सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बेळगाव आणि बेंगलोर येथे घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी हा आरोप केला असून भाजप वर घणाघाती टीका केली आहे.