शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ मंत्री नक्वी यांना भेटणार केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय बेळगाव येथे पुनर्स्थापित करावे, अशी मागणी शिवसेना खासदारांची शिष्टमंडळ केंद्रीय अल्पसंख्यांक आयोग खात्याचे मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांच्याकडे करणार आहे. खासदारांचे शिष्टमंडळ यासंदर्भात मंत्री नक्वी यांची आज सायंकाळी 4 वाजता भेट घेत आहे.
शिवसेना खासदार यांचे शिष्टमंडळ लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे मंत्री मुक्तार अब्बास नकवी यांची आज गुरुवारी भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात खासदार अरविंद सावंत, खासदार संजय राऊत, खासदार धैर्यशील माने, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे आदींचा समावेश असणार आहे. बेळगावातून चेन्नई येथे स्थलांतरीत करण्यात आलेले केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय पूर्ववत बेळगाव येथे सुरू करावे अशी मागणी हे शिष्टमंडळ मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांच्याकडे करणार आहे.
बेळगाव येथे केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे जे कार्यालय होते ते पश्चिम विभागाचे आहे आणि अशी देशात फक्त 4 कार्यालये आहेत. पश्चिम विभागीय कार्यालय हे चार राज्यं आणि एक केंद्रशासित प्रदेशासाठी आहे. गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि दादरा नगर हवेली यांच्यासाठी असणारे हे कार्यालय काढून घेऊन ते आता चेन्नई येथे स्थलांतरित केल्यामुळे संबंधित चारही राज्यांना फरक पडणार आहे. विशेष करून तेथील भाषिक अल्पसंख्यांकांना जास्त फरक पडणार आहे. सदर कार्यालय 2020 साली बेळगाव येथून चेन्नई येथे स्थलांतरित करण्यात आले. तथापि आतापर्यंत या कार्यालयाच्या माध्यमातून जे अहवाल सादर केले गेले ते सर्व बेळगावच्या बाजूने आहेत. त्यामुळे कुठेतरी हे कार्यालय बेळगावला असणे आवश्यक आहे. सध्या हे कार्यालय स्थलांतरित करण्याबरोबरच या कार्यालयाच्या अंमलबजावणीच्या गोष्टी किंवा त्या कार्यालयाची ताकद वाढविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
शिवसेना खासदारांची शिष्टमंडळ केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय बेळगाव येथे पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्याबरोबरच त्या कार्यालयाची ताकद कशी वाढवता येईल, याबाबतही केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांच्याशी चर्चा करणार आहे. बेळगावच्या युवकांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत दाखल झाल्यानंतर केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय बेळगाव येथे पुनश्च सुरू करावे या मागणीचा पाठपुरावा सुरू केला होता. त्या पाठपुराव्याला यश आले असून शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ आता थेट केंद्रीय अल्पसंख्याक आयोग खात्याच्या मंत्र्यांकडे धडक मारून त्यांची भेट घेण्याद्वारे बेळगावातील केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या कार्यालयाची मागणी करणार आहेत.