Saturday, January 18, 2025

/

निपाणी पालिकेवरील भगव्या ध्वजावर वक्रदृष्टी

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी नगरपालिकेवर भगवा ध्वज फडकावून तेथील राष्ट्रध्वजाचा अवमान केला जात आहे. तरी तो बेकायदेशीर भगवा ध्वज येत्या 2 -3 दिवसात हटविण्यात यावा, अन्यथा त्याच्याविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मुडलगीचे माहिती हक्क कार्यकर्ता भिमाप्पा गडाद यांनी सरकारला दिला आहे.

भिमाप्पा गडाद यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपरोक्त इशारा दिला आहे. यापूर्वी राष्ट्रध्वजाचा अवमान करून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवण्यात येत होता. मात्र त्यावेळी आमचे मंत्री व आमदार डोळे झाकून बसत होते. यापद्धतीने जवळपास 30 वर्षे बेळगाव महापालिकेच्या ठिकाणी राष्ट्रध्वजाचा अवमान होत असतानाही आमचे लोकप्रतिनिधी शांत होते. मात्र त्याच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर तो भगवा ध्वज काढण्यात आला.

त्याचप्रमाणे येळ्ळूर हे गाव कर्नाटकात असतानाही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या गुंडांनी त्याठिकाणी महाराष्ट्र राज्य म्हणून फलक लावला होता. त्याच्या विरोधातही अर्ज विनंत्या करण्यात येऊन देखील आमच्या लोकप्रतिनिधींनी कोणतीच कारवाई केली नव्हती. शेवटी त्या फलकांसाठी देखील आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागली आणि न्यायालयाच्या आदेशावरून प्रचंड पोलिस बंदोबस्तात तो फलक हटविण्यात आला.

याव्यतिरिक्त 1 नोव्हेंबर राज्योत्सव दिनी समितीकडून काळा दिन पाळला जातो. त्यावर देखील अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही. यापूर्वी रोशन बेग गृहमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना जेलमध्ये टाकू असे भाषण केले होते. मात्र त्यांचे ते भाषण कागदावरच राहिले आणि समितीवर कोणतीच कारवाई झाली नाही. आता निपाणी नगरपालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून भगवा ध्वज फडकविण्यात आला आहे. याबाबतीतही सरकार अद्यापपर्यंत डोळे झाकून बसले आहे. कर्नाटक म्युन्सिपल कायद्यानुसार राष्ट्रध्वज आणि सरकार मान्य ध्वज वगळता अन्य कोणताही ध्वज नगरपालिकेवर फडकविताना येत नाही. तसे करणाऱ्याला 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. मात्र निपाणी नगरपालिकेमध्ये 29 मे 2019 रोजी भगव्या ध्वजाचा ठराव संमत करून तो पालिकेवर फडकविण्यात आला आहे.

हा प्रकार बेकायदेशीर असून निपाणी नगरपालिकेवर भगवा ध्वज फडकविण्यात कारणीभूत असणाऱ्या लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी. तसेच येत्या दोन -तीन दिवसात तो भगवा ध्वज हटविण्यात यावा अन्यथा त्याच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल आणि त्यावेळी कांही विपरीत परिस्थिती उद्भवल्यास त्याला संपूर्णपणे सरकार जबाबदार राहील, असा इशारा भिमाप्पा गडाद यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. तसेच याबाबतचे निवेदन आपण मुख्यमंत्र्यांना धाडले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.