बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती विटंबनेच्या घटनेनंतर बेळगावात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मराठी युवकांवरील खटले मागे घेऊन त्यांची तात्काळ मुक्तता करावी, अशी विनंती महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकड करावी, अशी मागणी युवा आमदार रोहितदादा पवार यांनी आज महाराष्ट्र विधानसभेत केली.
बेंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी बेळगावातील मराठी युवकांना ताब्यात घेऊन केलेल्या अन्यायाच्या विरोधात ‘पॉईंट ऑफ इन्फोर्मेशन’ वर आमदार रोहित दादा पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात आवाज उठविला.
बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणी प्रसिद्ध झालेल्या बेळगाव व कर्नाटकाच्या कांही बातम्या सभागृहासमोर सादर करून बेळगावातील मराठी युवकांच्या घरात घुसून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर खोटे खटले दाखल करण्यात आले आहेत, असे पवार यांनी सांगितले. बेळगाव परिसराच्या बाबतीत सगळे जण राजकारण करतात. मात्र त्या परिसरातील युवकांवर अन्याय होतो, त्यांना अडचणी येतात त्यावेळी त्या अडचणीच्या काळात महाराष्ट्र सरकारने त्यांच्या सोबत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारशी बोलून ज्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांची ताबडतोब सुटका करण्यास सांगावे, असे ते म्हणाले.
त्याचप्रमाणे तसे न झाल्यास महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्याबाबतीत विनंती करावी. जर का या सर्व गोष्टी नाही झाल्या आणि बेळगावातील युवकांवर अन्याय अशाच पद्धतीने सुरू राहिला तर मला वाटतं महाराष्ट्रातील युवक शांत बसणार नाहीत.
हे सर्व युवक सीमाभागातील मराठी युवकांना मदत करण्यासाठी जातील. तेंव्हा परिस्थितीचे एकंदर गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारशी चर्चा करून त्या युवकांची ताबडतोब मुक्तता करण्याची विनंती करावी. या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी, असे युवा नेते आमदार रोहितदादा पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले.