बेळगाव महापौर निवडणुकीबाबत सस्पेन्स अद्याप कायम असून महापौर व उपमहापौर पदाच्या आरक्षणाबाबत नगरविकास खात्याने अद्याप स्पष्टीकरण दिले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे
बेळगाव, हुबळी -धारवाड व गुलबर्गा या तीन महापालिकांची निवडणूक एकाच वेळी झाली. यापैकी गुलबर्गा महापालिकेची आरक्षणानुसार 20 नोव्हेंबर रोजी होणारी महापौर-उपमहापौर निवडणूक विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यामुळे रद्द झाली आहे.
याउलट बेळगाव व हुबळी-धारवाड या दोन महापालिकांच्या महापौर उपमहापौर निवडणुकीचा तिढा अद्याप कायम आहे. सध्या नूतन नगरसेवक विधान परिषद निवडणुकीत व्यस्त आहेत. तथापि विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर तरी महापौर-उपमहापौर निवडणूक होईल याबाबतची खात्री महापालिकेला देखील नाही. आरक्षणाबाबतची स्पष्ट माहिती जोपर्यंत नगरविकास खात्याकडून येत नाही तोवर महापौर निवडणूक होणार नसल्याचे काल कौन्सिल विभागाचे म्हणणे आहे.
दरम्यान, तीन महिने लोटले तरी महापौर निवडणूक न झाल्यामुळे नगरसेवक अस्वस्थ आहेत. निवडणूक तातडीने व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. नगरसेवकपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना महापालिकेच्या कामकाजात सहभागी होता येते.
महापौर निवडणुकीच्या आधी त्यांना शपथ दिली जाते. यासाठीच त्यांना महापौर निवडणुकीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. एकंदर नगर विकास खात्याने पदांच्या आरक्षणाबाबत अद्याप स्पष्टीकरण न दिल्यामुळे महापौर निवडणूक रखडली आहे.