लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका–यल्लम्मा देवस्थानच्या हुंडीत एका ऑक्टोबर
महिन्यात सुमारे १ कोटी २० लाख रुपये किंमतीचे सोन्या–चांदीचे दागिने, साहित्य व रोख रक्कम जमा झाली आहे.भाविकांनी आपल्या पूज्य देवीला इतकी मोठी रक्कम दान दिली आहे.
कोरोना लॉकडाउननंतर प्रथमच सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानच्या हुंडीत भक्तांनी जमा केलेला हा यैवज विक्रमी दान ठरले आहे.
महामारी कोरोनामुळे अन्य देवस्थानांप्रमाणेच सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानही १ वर्ष ८ महिने बंद होते. २८ सप्टेंबरपासून देवस्थान भक्तांसाठी खुले करण्याचा आदेश बेळगाव जिल्हा प्रशासनाने बजावला होता.
तेंव्हापासून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील लाखो भक्तांनी सौंदत्तीत येऊन रेणुका-यल्लम्मा देवीचे दर्शन घेतले आहे.
शुक्रवारी सौंदत्ती तालुका प्रशासनातर्फे देवस्थानच्या हुंडीत ऑक्टोबरमध्ये जमा झालेल्या दानाची मोजदाद करण्यात आली. त्यावेळी केवळ एकाच महिन्यात तब्बल १ कोटी २० लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागदागिने, साहित्य व रोख रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आले.
यात १५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे, २ लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने दान स्वरूपात हुंडीत जमा झाले. देवस्थानच्या ८५ आणि बँकांच्या कर्मचाऱ्यांनी या मोजणीत भाग घेतला. हुंडीत व अन्य मार्गाने सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानचे वार्षिक उत्पन्न ४ कोटी पर्यंत जाते.