ऐन हिवाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना नेमका कोणता ऋतू सुरू आहे? हेच समजेनासे झाले आहे. ‘पावसाळा नाही आणि हिवाळा पण नाही हा तर हिवसाळा’ या प्रकारचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गेल्या कांही वर्षांपासून वातावरणात मोठे बदल होत असून अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याखेरीज पावसामुळे नागरिकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडता येईनासे झाले आहे.
छोटे व्यवसायिक ग्राहकांची वाट पाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सर्वसामान्य नागरिक या अवकाळी पावसाला कंटाळले आहेत. दिवाळी व त्यानंतर साधारणपणे थंडीला सुरुवात होते. परंतु यंदा दिवाळीत रात्री अनेक वेळा फॅन लावावा लागला.
सध्या तर केंव्हा पाऊस पडेल हे सांगता येत नाही. केंव्हाही पाऊस पडू शकतो या मानसिकतेतून नागरिक त्या तयारीनिशी घराबाहेर पडत आहेत. दिवसा किंवा संध्याकाळी पाऊस पडत असल्याने बाहेर जाणाऱ्यांना छत्री किंवा रेनकोट घेऊन जावे लागत आहे.
रात्रीच्या वेळी उकाड्याने फॅन लावावा लागतो, तर पहाटे मॉर्निंग वॉक किंवा कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना स्वेटर किंवा रेनकोट घालावा लागत आहे. याबद्दलचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.