Wednesday, December 18, 2024

/

प्राचार्य डॉ. शोभा नाईक यांना कबीर पुरस्कार जाहीर

 belgaum

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकारितेत अनेक वर्ष कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार आणि परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते संजय कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या शिरोडा येथील परिवारातर्फे देण्यात येणारा ‘कबीर साहित्य पुरस्कार’ बेळगाव येथील मराठी-कन्नड साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक तथा बेळगाव आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शोभा नाईक यांना जाहीर झाला आहे.

मराठीतील प्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या हस्ते बेळगाव येथील लोकमान्य ग्रंथालयाच्या सभागृहात शनिवार दि. 1 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वा. सदर पुरस्काराने डॉ.नाईक यांना गौरविण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक सामाजिक कार्यकर्ते डॉ. संपत देसाई आणि सिंधुदुर्ग विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

कबीर पुरस्काराचे स्वरूप रोख 10 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे असून यापूर्वी सदर पुरस्कार संपत देसाई यांच्या ‘एका लोक लढ्याची यशोगाथा’ या ग्रंथाला प्राप्त झाला होता. यावर्षी डॉ. शोभा नाईक यांच्या समग्र साहित्य कर्तृत्वाचा विचार करून सदर पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. डॉ. शोभा नाईक या सध्या बेळगाव आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कविता, समीक्षा, संशोधन आणि अनुवाद या साहित्य प्रकारात त्या लेखन करतात. त्यांचे आजवर विविध लेखन प्रकारातील ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या भारतीय साहित्य कोश निर्मिती मंडळ तसेच मराठी भाषा विकास नियामक मंडळावर सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत.Shobha naik

महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्काराने त्यांना तीन वेळा गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये संशोधन, समीक्षा आणि सौंदर्यशास्त्रासाठी असणाऱ्या श्री. के. क्षीरसागर या पुरस्काराचाही समावेश आहे. याखेरीज कर्नाटक शासनाच्या अकरावी व बारावी मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा म्हणून देखील त्या कार्यरत होत्या. तसेच त्यांचे कर्नाटक शासनाकडून कन्नड ग्रंथाचे मराठी अनुवाद प्रकाशित झालेले आहेत. ‘या जगण्यातून’ हा कवितासंग्रह, ‘जीवन नहर यांची आसामी कविता’ हा अनुवाद, भारतीय संदर्भातून स्त्रीवाद स्त्रीवादी समीक्षा आणि उपयोजन, लोकसंचितातील स्त्रीचित्तवेधक, बहिणाबाई चौधरी यांची कविता हा समीक्षा ग्रंथ, ‘देखणी :जगण्याचे ऊर्ध्वपातन’ हा समीक्षाग्रंथ, बेगम बर्वे :एकदृष्टीक्षेप हा समीक्षाग्रंथ, कन्नड संत कवी कनकदास अनुवाद, दुर्गा भागवत (साहित्य अकादमी) आदींसह प्राचार्य नाईक यांचे 16 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

त्याचप्रमाणे पुढील काळात साहित्य अकादमीतर्फे त्यांचे कांही ग्रंथ प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. या त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेऊन संजय कांबळे स्मृति कबीर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत असल्याचे कांबळे परिवारातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.