विधान परिषद निवडणुकीसाठी आपण बुथ एजंट राहू असे आमदार सतीश जारकीहोळी यांनी सांगितले असले तरी आमदार असल्यामुळे त्यांना तसे करता आले नाही. मात्र त्यांची दोन्ही मुले राहुल व प्रियांका यांनी आज बुथ एजंट म्हणून काम पाहिले.
केपीसीसी कार्याध्यक्ष यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी अलीकडेच विधान परिषद निवडणूक मतदानाप्रसंगी आपण बुथ एजंट म्हणून काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते. तथापि आमदार असल्यामुळे बुथ एजंट म्हणून काम करता येणार नसल्यामुळे त्यांनी ती जबाबदारी आपली दोन्ही मुले राहुल व प्रियांका यांच्यावर सोपविली.
आमदार सतीश जारकीहोळी हे स्वतः बुथ एजंट बनण्यासाठी गुंजाळ (ता. गोकाक) येथील मतदान केंद्राच्या ठिकाणी गेलेही होते. परंतु बुथ एजंट म्हणून काम करता येणार नसल्यामुळे केंद्रात बाहेरच थांबून त्यांनी मतदान प्रक्रियाची माहिती घेतली.
आपल्या वडिलांनी सूचना शिरसावंद्य मानून राहुल जारकीहोळी यांनी कुन्नूर मतदान केंद्र आणि प्रियांका जारकीहोळी यांनी शिंदिकुरबेट मतदान केंद्र येथे बुथ एजंट म्हणून काम पाहिले.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीदरम्यान दरवेळी भ्रष्टाचार व गैरप्रकार घडत असल्याचा आरोप करून काँग्रेसने यावेळी निवडणुकीचे व्हिडिओ चित्रीकरण केले जावे अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसार आज बऱ्याच ठिकाणी निवडणुकीच्या मतदानाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले.