जुने बेळगाव नाका व बी. एस. येडियुरप्पा मार्ग येथील दारूची दुकाने तात्काळ बंद करावीत तसेच चोरट्या मार्गाने सुरू असलेली गांजा आदी अंमली पदार्थांची विक्री थांबवावी, अशी मागणी जुने बेळगाव वासीयांनी केली आहे. त्यानिमित्ताने जुने बेळगाव नाका परिसर चर्चेत आला आहे.
गेल्या दोन वर्षात या भागात चार खुनाची प्रकरणे झाल्याने ग्रामस्थांनी या ठिकाणी असलेली दारू विक्रीची दुकाने अन्यत्र हलवा आणि या भागात चालणारे अवैध धंदे बंद करा अशी मागणी केली आहे त्यामुळे जुने बेळगाव नाका परिसरात अवैध धंदे वाढलेत का ?याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या दोन वर्षांच्या काळात या जुने बेळगाव नाका परिसरात दारू दुकानातील किरकोळ वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले त्यात मारामारी होऊन चार खून घडले आहेत त्यातील एक युवकाचा खून आठ दिवसांपूर्वी झाला होता.मुख्य नाक्यावर गणेश आणि मारुती मन्दिर आहे या व्यतिरिक्त बस थांबा सुद्धा आहे त्यामुळे या परिसरात नेहमी शाळेला जाणारी मुले व कॉलेजला जाणारी मुले -मुली तसेच महिलांची नेहमी वर्दळ असते.
होसुर जुने बेळगाव भागातील शेती आहे शेतवडीत महिला ये जा करत असतात त्यामुळे दारुड्या कडून विचित्र हावभाव करणे, महिलांची छेडछाड करणे असे प्रकार घडत आहेत इतकेच काय तर अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांची वाढ झाली याचा त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप जुने बेळगाव ग्रामस्थांनी केलाय.
मागील काही वर्षात शहापूर पोलिसांना या भागांतील अवैध धंदे आणि मारामाऱ्या रोखण्यात अपयश आले आहे त्यामुळे जुने बेळगावच्या लोकांना याचा त्रास होत आहे.एकेकाळी जुने बेळगाव नाका परिसरात एकही दारूचे दुकान नव्हते मात्र गेल्या काही वर्षात येडीयुरप्पा मार्गाचे दुपदरीकरण झाल्या नंतर या भागांतील हालचाली वाढल्या दारू दुकाने, हॉटेल वाढ झाली आहे.
ज्या काळात जुना धारवाड रोड होता त्याकाळी नाक्यावर काळे धंदे होत नव्हते मात्र आता येडीयुरप्पा रोडचा विकास झाल्यानंतर इथली वर्दळ वाढली हॉटेल दारू दुकाने झाली त्यानंतर गैर प्रकारात वाढ झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.या जुने बेळगाव नाक्या कडे पोलिसांनी विशेष लक्ष देऊन ही समस्या सोडवावी अशी मागणी वाढू लागली आहे.