गोवा राज्यातील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी किंवा पार्ट्यांना हजेरी लावताना प्रत्येकाला कोरोना निगेटिव्ह अहवाल किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी स्पष्ट केले.
ख्रिसमस आणि न्यू इयर हंगामातील पर्यटन व्यवसाय लक्षात घेऊन गोवा सरकारने किनारपट्टीवरील राज्यांमध्ये तूर्तास नाईट कर्फ्यू लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रेस्टॉरन्ट आणि पार्ट्यांमधील लोकांचे 100 टक्के लसीकरण झालेले असले पाहिजे अथवा त्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह अहवाल असणे सक्तीचे असेल, अन्यथा संबंधित कार्यक्रमास परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, गोवा राज्यात ओमिक्रॉन व्हेरीएंटने शिरकावा केला असून एक रुग्ण सापडला आहे. चिंतेची बाब म्हणजे कोरोना संक्रमणाचा दर दररोज वाढत आहे.
यासंदर्भात बोलताना संक्रमण वाढत राहिले तर कृती दलाची बैठक येत्या सोमवार 3 जानेवारी रोजी बोलावण्यात आली असून त्या बैठकीमध्ये पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत मोठे कार्यक्रम, लग्न सोहळे, पार्टी टाळावी, वातानुकूलित सभागृहात ऐवजी खुल्या जागेत कार्यक्रम घ्यावेत, असे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी केले आहे.