बेळगाव जिल्ह्यातील विधान परिषदेच्या दोन जागांसाठी उद्या शुक्रवार दि. 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आर. वेंकटेश कुमार यांनी दिली.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी शहरातील ज्योती कॉलेज मतदान केंद्राला जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवडणूक केंद्रावर येऊन निवडणूक कर्मचाऱ्यांनी निवडणूक साहित्य संबंधित मतदान केंद्रावर नेण्याची तयारी सुरू केली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी आर. वेंकटेशकुमार म्हणाले, सर्व तालुका केंद्रात मस्टरिंग केंद्र स्थापन केली आहेत. तेथे आज मस्टरिंग करण्यात येईल. त्याचप्रमाणे उद्या सायंकाळी मतदान समाप्त झाल्यानंतर डीमस्टरिंग करून सर्व मतपेट्या चिक्कोडी येथील आर. डी. हायस्कूल मतमोजणी केंद्रावर नेण्यात येतील.
त्या ठिकाणी सर्व मतपेट्या ठेवल्यानंतर मध्यरात्री 12 वाजता स्ट्रॉंगरूम सील करण्यात येईल. यावेळी उमेदवारांनाही बोलावले जाईल. ग्रामपंचायत व नगरपंचायत पातळीवर मतदारांना मतदान कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. निरक्षर आणि दिव्यांग मतदारांना मतदानाच्या वेळी सहाय्यक घेण्याची मुभा देण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बेळगाव विधान परिषद मतदारसंघात एकूण 8,875 मतदार आहेत. चिक्कोडी येथे गेल्या 4 डिसेंबर रोजी सर्व उमेदवारांची बैठक घेऊन मतदान व मतमोजणी प्रक्रिया, एकेका मताचे मूल्य किती असते? आदी मुद्द्यांवर 2 तास सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
जिल्ह्यातील सर्व 511 मतदान केंद्रांवर या वेळी प्रथमच व्हिडिओ कॅमेरे वापरण्यात येतील. त्याशिवाय सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत. एका मतदान केंद्राला 5 याप्रमाणे एकूण 3,000 अधिक निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आमदारांना बुथ एजंट होता येत नाही. कारण त्यांना मतदान करण्यासाठी अन्य केंद्रावर जायचे असते असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निवडणूक कर्मचारी निवडणूक साहित्यासह आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले.