विधान परिषदेच्या 25 जागांसाठीच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठे आमिष दाखविले जात असल्यामुळे आत्तापर्यंतची राज्यातील ही सर्वात महागडी निवडणूक ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांसाठी उमेदवार प्रत्येक मतासाठी 25 ते 60 हजार रुपये मोजत आहेत. उत्तर कर्नाटकातील एका मतदारसंघात तर कहर झाला आहे. या ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवार तुल्यबळ असल्यामुळे एका मताचा भाव जवळपास 1,00,000 रुपयांपर्यंत पोचल्याचे सांगण्यात येते. निर्वाचन क्षेत्र लहान असल्यामुळे तसेच फक्त स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतीचे सदस्य मतदान करणार असल्यामुळे उमेदवार देखील इतक्या मोठ्या रकमेचा विचार करत नसल्याचे समजते. विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघातील मतदारांची संख्या सरासरी 4 ते 9 हजार इतकी आहे. त्यामुळे पैशांची खैरात करण्याबरोबरच उमेदवार मतदारांसाठी रात्री उशिराच्या पार्ट्या, मोफत भेटवस्तू आदींचाही अवलंब करत आहेत.
विधान परिषद निवडणुकीमध्ये पैशाचे वाटप करण्याची प्रथा गेल्या दोन निवडणुका पासून सुरू झाली आहे. त्यानंतर प्रत्येक मताची किंमत मोठ्या प्रमाणात वाढत गेली आहे. मागील निवडणुकीत एका मताची किंमत 5,000 ते 15,000 रुपये इतकी होती मात्र आता ती तिपटीने वाढली आहे, असे एका जिल्हा काँग्रेस सूत्राने स्पष्ट केले.
दरम्यान, मतदाराने आपल्याला मत घालावे यासाठी उमेदवार देखील जागरूक असून ते मतदारांना पैसे देण्यापूर्वी कुटुंबीयांची अथवा स्थानिक देवदेवतांची शपथ घालत आहेत. त्याचप्रमाणे सध्या जे उमेदवार रिंगणात आहेत त्यांचा भर मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यावर आहे.
सदर निवडणूकीत बहुतांश मतदारांनी आपली मालमत्ता 30 कोटीपर्यंत जाहीर केली आहे. यामध्ये बेंगलोर शहरातील एक उमेदवार सर्वात आघाडीवर असून त्यांची मालमत्ता 1,753 कोटी रुपये इतकी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी प्रमाणे निवडणूक आयोगाचे या निवडणुकीवर लक्ष नसल्यामुळे राजकीय पक्ष स्वैर सुटले असून उमेदवारांकडून वारेमाप पैसा उधळला जात आहे.
News courtasy:times of india