सीमावर्तीय भागांतील मराठी जनतेवर अत्त्याचार होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. खोटे गुन्हे दाखल करणे, मराठी कागदपत्रे न देणे, मराठी जनतेची अडवणूक करणे एकंदर मराठी माणसाचे जगणे वेदनामय करून टाकले आहे.हिटलरने ज्यू लोकांवर केलेले अत्त्याचार किंवा बाबराने नरमुंडाचे केलेले मनोरे याचे दाखले क्रौर्यते साठी दिले जातात, परंतु सीमावर्तीय भागात कानडी प्रशासनाकडून केले जाणारे अत्त्याचार ,हे या अत्त्याचारापेक्षा तसूभरही कमी नाही.
मराठी लोकांना केली जाणारी मारहाण किंवा त्यांची केलेली अडवणूक पहाता मराठी माणसाच जगणं सीमा भागात असह्य होऊन गेले आहे.या परिस्थितीत सीमावर्तीय भागातील लोकांच्या सोबत महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीनी ताकदिने उभे राहण्याची गरज आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी यांच्यावर कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यानी केलेल्या पोलीस संरक्षणातील भ्याड शाई हल्याचे इतिवृत्त महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीच्या समोर मांडण्यासाठी, बेळगावातील युवक नेत्यांचे एक शिष्टमंडळ तातडीने दिल्लीला रवाना झाले आहे.
तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील आणि बेळगाव बेलॉंगस टू महाराष्ट्र संघटनेचे पियुष हावळ मंगळवारी दुपारी दिल्लीत दाखल झाले आहेत.विमानतळावर कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी दळवी यांच्या वरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील खासदारासमोर ते आपले म्हणणे मांडतील,त्याच बरोबर बेळगावच्या इतर समस्या दिल्ली दरबारी महाराष्ट्र खासदारांपुढे मांडणार आहेत.