कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याची जनजागृती करताना समिती नेत्यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला आहे.
माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक आदींनी गावा गावांना भेटी देत मराठी भाषकाना महामेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.
सध्या ग्रामीण भागातील शेतकरी दुःखात असून हाता तोंडाला आलेलं पीक वळीव पावसात खराब झाल्याने ओल्या दुष्काळाला सामोरं जावं लागतं आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती मराठीच्या सीमा प्रश्नाच्या मुद्द्यासोबत नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत आली आहे त्यामुळे महा मेळाव्यात सुगीत असलेल्या शेतकऱ्यांना देखील सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.एकरी 50 हजार रुपये पीक नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करणारच आहे.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शनिवारी
किणये कर्ले बेळगुंदी येथे जनजागृती बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या या गावातील शेकडो जणांनी बैठकीला हजेरी लावताना मेळावा यशस्वी करण्याचा वज्र निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
ग्रामीण भागाची नस सापडलेले समितीचे दोन दिग्गज नेते आघाडीवर एकसाथ लढत असताना पाहून ग्रामीण भागातील नागरिकांचे मन भरून आले आहे .वळीवाने शेतकऱ्यांचे नुकसान केलं असलं तरी बळी राजाच्या प्रश्नासाठी किणेकर सुंठकर सारखे नेते एकत्र आलेले पाहून शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस लागतील असे जाणकार नागरिकांतून बोलले जात आहे.