कर्नाटक सरकारच्या पाठिंब्यावर कांही कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड कृत्याची महाराष्ट्र सरकारने योग्य दखल घेऊन कर्नाटक सरकारला योग्य समज द्यावी. तसेच केंद्र सरकारच्याही निदर्शनास निदर्शनास ही बाब आणून देण्याबरोबरच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी आपला मराठी बाणा दाखवून आपण सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी आहोत हे दाखवून द्यावे, या ठरावासह एकूण चार ठराव आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आयोजित महामेळाव्यात एकमताने मंजूर करण्यात आले.
बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित मराठी भाषिकांचा महामेळावा आज शहरातील व्हॅक्सिन डेपो मैदानावर पार पडला. मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महामेळाव्यात विविध चार ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. सदर ठराव पुढील प्रमाणे आहेत.
1) महाराष्ट्राने 2004 साली सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादासंदर्भात दावा दाखल केल्यानंतर सीमाभाग आणि विशेषता बेळगाव शहर कर्नाटकचे आहे, हे दाखविण्यासाठी कर्नाटक सरकार अनेक मार्गाने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 2006 पासून बेळगावमध्ये विधानसभेचे अधिवेशन घेण्यास सुरुवात केली आहे. या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी माणूस बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन करून निषेध करत आला आहे. आजचा हा महामेळावा कर्नाटक अत्याचारांचा तीव्र शब्दात निषेध करीत असून समस्त सीमाभाग व बेळगाव महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असून तो महाराष्ट्रात सामील केल्याशिवाय सीमावासीय स्वस्त बसणार नाही असा विश्वास व्यक्त करीत आहोत.
2) शांततेच्या मार्गाने महामेळाव्याचे आयोजन करत असताना समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर काळा रंग फेकून त्यांचा अवमान करणाऱ्या कन्नड गुंडांचा हा महामेळावा तीव्र शब्दात निषेध करत आहे. या भ्याड कृत्याची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हा महामेळावा करीत आहे. 3) कन्नड गुंडांनी पोलीस संरक्षणात जे भ्याड कृत्य केले आहे, त्याच्या निषेधार्थ मंगळवार दि. 14 डिसेंबर रोजी बेळगावातील मराठी जनतेने आपापले व्यवहार बंद ठेवून ‘बेळगाव बंद’ करावे. या बंदमध्ये अत्यंत शांततेने भाग घेऊन बेळगाव बंद यशस्वी करावा, असे आवाहन महामेळावा व महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात येत आहे.
4) कर्नाटक सरकारच्या पाठिंब्यावर कांही कन्नड गुंडांनी जे भ्याड कृत्य केले. त्याची महाराष्ट्र सरकारने योग्य दखल घेऊन कर्नाटक सरकारला योग्य समज द्यावी. केंद्र सरकारच्याही निदर्शनास ही बाब आणून द्यावी. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी आपला मराठी बाणा दाखवून आपण सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी आहोत हे दाखवून द्यावे, अशी विनंती हा महामेळावा करीत आहे.