Tuesday, December 24, 2024

/

महामेळावा यशस्वी करण्यासाठी समितीने कसली कंबर!

 belgaum

कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावातील अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्याबरोबरच मराठी अस्मिता जपून महाराष्ट्रात विलीन होण्याच्या आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 13 डिसेंबर रोजीचा नियोजित महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केला असून त्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरू झाली आहे.

मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ सोडण्यासाठी येत्या सोमवार दि 13 डिसेंबर पासून बेळगावात कर्नाटक सरकारच्या विधीमंडळाचे अधिवेशन भरविले जात आहे. त्याला विरोध व निषेध नोंदविण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी डेपो मैदानावर मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. सीमाप्रश्न सोडवणूकीच्या दृष्टिकोनातून तसेच कर्नाटका छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने विविध माध्यमातून होत असलेल्या अवमानाच्या निषेधार्थ आणि विधीमंडळ अधिवेशनाला विरोध दर्शनासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली या महामेळाव्याच्या माध्यमातून रणशिंग फुंकले जाणार आहे. टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर दरवर्षीप्रमाणे हा सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांचा कर्नाटक शासनाच्या अन्यायी धोरणाविरुद्धचा महामेळावा आयोजित केला जाणार आहे. सध्या व्हॅक्सिन डेपो मैदान परिसरात विकास कामांचे साहित्य पडून आहे. तथापि हे साहित्य श्रमदानाने हटवून महामेळावा यशस्वी करण्याची तयारी समिती कार्यकर्त्यांनी दर्शवली आहे. महामेळावा कायदा व सुव्यवस्था भंग न होता कायद्याच्या चौकटीत यशस्वी व्हावा यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीचे क्रियाशील सदस्य आणि विद्यमान जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी हे गेल्या कित्येक वर्षापासूनची प्रशासन आणि मराठी भाषिक यांच्यातील दुवा साधण्याची भूमिका यंदाही पार पाडत आहेत. मध्यवर्तीचे सदस्य विकास कलघटगी हे यंदाही आपल्यापरीने अत्यंत खुबीने मराठी भाषिकांचा प्रशासकीय आणि पोलिस प्रशासनाच्या पातळीवर समन्वय साधून महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा यशस्वी व्हावा यासाठी झटत आहेत.

कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी व्हॅक्सिन डेपो मैदानावर मराठी भाषिकांना आपल्यावर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची संधी लोकशाहीच्या माध्यमातून मिळावी यासाठी महामेळावा आयोजनास परवानगी दिली जावी, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांकडे महामेळावा आयोजनासअनुमती मिळावी यासाठी रितसर अर्ज करण्यात आला आहे. सदर अर्जांना संबंधितांकडून अद्याप उत्तर मिळालेले नसले तरी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मेळावा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे घटक समित्यांनी होण्याबरोबरच गावागावांमध्ये महामेळाव्याबाबत जनजागृती केली जात असून दरवेळी प्रमाणे कोणत्याही परिस्थितीत व्हॅक्सिन डेपो मैदानावर महा मेळावा होणारच कार्यकर्त्यांनी कोणतीही तमा न बाळगता 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन नेतेमंडळी कडून केले जात आहे.

दरम्यान, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीला न जुमानता महामेळावा यशस्वी करावा. मराठी माणूस नेहमी संयमाने व शांततेत आंदोलन करत असताना प्रशासन त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आले आहे. गेल्या 17 जानेवारी 1956 च्या लढ्यालाही असेच गालबोट लावण्यात आले होते. त्यामुळे यावेळी मौखिक जनजागृती करण्याबरोबरच सर्वांनी सध्याचे प्रभावी माध्यम सोशल मीडियाचा वापर करून जनजागृती करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.