सध्या नवी दिल्लीत असलेल्या बेळगावच्या युवकांच्या शिष्टमंडळांने आज गुरुवारी सकाळी मुंबई महाराष्ट्रातील कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याबद्दल लोकसभेत आवाज ठेवण्याची विनंती केली. त्यावर खासदार शिंदे यांनी देखील संसदेत निश्चितपणे आवाज उठवण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील आणि बेळगाव बिलोंग्ज टू महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष पियुष हावळ यांच्यासह शिवसेना मुंबई आरोग्य मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी नवी दिल्ली येथे आज सकाळी कल्याणचे (मुंबई) खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन दळवी यांच्यावरील हल्ल्यासह बेळगावचा मुद्दा लोकसभेत मांडण्याची विनंती त्यांना केली.
त्याचप्रमाणे केंद्रीय अल्पसंख्याक आयोग खात्याचे मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांच्या देखील भेटीचे नियोजन करावे आणि भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय पुन्हा बेळगावला प्रस्थापित करण्याची विनंती त्यांना करावी, अशी मागणीही खासदार शिंदे यांच्याकडे करण्यात आली.
बेळगावच्या युवकांचे शिष्टमंडळ गेले तीन दिवस नवी दिल्ली येथे मुक्काम ठोकून आहे. हे शिष्टमंडळ दीपक दळवी यांच्यावरील हल्ला आणि सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय या संदर्भात ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या खासदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
त्या अनुषंगाने आज बुधवारी सकाळी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची त्यांनी भेट घेतली. तसेच त्यांना बेळगावचा आवाज लोकसभेत उठवावा, अशी विनंती केली गेली. त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व माहिती घेत आपण लोकसभेमध्ये जरूर आवाज उठवू असे आश्वासन दिले.