नगरसेवकांनी ओढवून घेतली मराठी भाषिकांची नाराजी-विधान परिषदेच्या काल झालेल्या निवडणुकीप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कांही नगरसेवकांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांसमवेत मतदान करून मराठी भाषिकांची नाराजी ओढवून घेतली आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकाना मत स्वातंत्र्य दिले होते. त्यानुसार सर्व मतदारांनी मतदान केले. मात्र एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासोबत न जाता त्यांनी स्वतंत्रपणे मतदान करणे अपेक्षित असताना कांही मतदारांनी भाजप नेत्यासोबत जाऊन मतदान केल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विधान परिषद निवडणुकीत मतदानापासून अलिप्त रहावे अशी मागणी मराठी भाषिकांतून सातत्याने होत होती. त्यामुळे समिती नगरसेवक कोणती भूमिका घेणार? याबाबत उत्सुकता होती. दरम्यान तीनही प्रमुख उमेदवार व समिती नगरसेवक एकमेकांच्या संपर्कात होते.दक्षिण भागातील समितीच्या एका नगरसेवकाने स्वता एकटा जाऊन मतदान करणे पसंत केले.
त्यामुळे समितीचे नगरसेवक निवडणूकीत मतदान करणार हे स्पष्टच झाले होते. तथापि थेट भाजपच्या नेत्यांसोबत महापालिकेत जाऊन मतदान करतील अशी अपेक्षा मात्र मराठी भाषिकांना नव्हती.
यात भर म्हणून मतदानानंतर भाजप नेत्यांसमवेत संबंधित नगरसेवकांनी विजयाची खूण दर्शवत फोटोसेशन देखील केल्यामुळे मराठी भाषिकांच्या नाराजीमध्ये अधिकच भर पडली आहे.